एक ग्राहक तब्बल २०० लिटरची पाण्याची टाकी घेऊन पोहोचला पेट्रोल पंपावर !* चिखली येथील एका पंपावर घडला अनोखा प्रकार

एक ग्राहक तब्बल २०० लिटरची पाण्याची टाकी घेऊन पोहोचला पेट्रोल पंपावर !
* चिखली येथील एका पंपावर  घडला अनोखा प्रकार
बुलढाणा  : (एशिया मंच न्यूज )
          इंधन टंचाईच्या अफवांमुळे जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेल पंपांवर ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. याच गर्दीत एक अनोखा प्रकार चिखली येथील एका पंपावर घडला. एक ग्राहक चक्क २०० लिटर क्षमतेची प्लास्टिकची पाण्याची टाकी घेऊन पंपावर आला. पंप कर्मचाऱ्यानेही काही विचार न करता त्या टाकीत डिझेल भरून दिले. ग्राहक टाकी भरून निघून गेला.

          इंधन टंचाईच्या अफवांमुळे जिल्हाभरात प्लास्टिक डब्बे, कॅन, बॅरल आणि मोठ्या टाक्या घेऊन ग्राहक रांगेत उभे राहिल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. काही ठिकाणी २ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक पंपांवर इंधन संपल्याच्या बातम्या येत आहेत. यामुळे सामान्य वाहनधारकांना मोठी गैरसोय होत आहे.
           दुसरीकडे, बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी इंधन साठ्यावर कडक निर्बंध आणले आहेत. अनावश्यक साठेबाजी रोखण्यासाठी आणि कृत्रिम टंचाई टाळण्यासाठी निर्देश दिले आहेत. मात्र, अनेक पंप चालकांकडून या आदेशांची ऐशीतैशी होत असल्याचे दिसून येत आहे. काही पंपांवर मोठ्या प्रमाणात इंधन विक्री सुरू असल्याचे प्रकार समोर येत आहेत.

          अफवांमुळे निर्माण झालेल्या या पॅनिक बायिंगमुळे वास्तविक इंधन पुरवठा बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अफवांवर विश्वास न ठेवता शांत राहावे आणि वाहनांमध्ये फक्त आवश्यक तेवढेच इंधन भरावे. प्रशासनाने इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, तरीही पंप चालकांकडून नियमांचे पालन होत नसल्याने प्रशासनाची भूमिका काय राहील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.