गरिबीशी झुंज देत जुबेर सैय्यद यांची पोलिस दलात भरारी * आईच्या कष्टांना यशाची गोडी

गरिबीशी झुंज देत जुबेर सैय्यद यांची पोलिस दलात भरारी 
* आईच्या कष्टांना यशाची गोडी
सिं.राजा : (एशिया मंच न्यूज )
            तालुक्यातील सावखेड तेजन येथील मूळ रहिवासी आणि सध्या पिंपळगाव बुद्रुक येथे वास्तव्यास असलेल्या जुबेर युनूस सैय्यद यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करत महाराष्ट्र पोलिस दलात निवड मिळवून जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाचे प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे. त्यांच्या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

        जुबेर यांचे वडील मरहुम युनूस सैय्यद हे मामाच्या गावी स्थायिक झाले होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत सामान्य होती. आई शमीम सैय्यद व वडील दोघेही टेलर काम करून संसाराचा गाडा ओढत होते. मात्र, काही वर्षांपूर्वी वडिलांचे अपघाती निधन झाल्यानंतर संपूर्ण जबाबदारी आईवर आली. दोन मुलं आणि एक मुलगी यांचा सांभाळ करताना त्यांनी रोजंदारी मजुरी करून संसार उभा ठेवला.

     अशा कठीण परिस्थितीतही आईने मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. “परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिक्षण सोडायचे नाही” हा निर्धार तिने कायम ठेवला. याच संस्कारातून घडलेला जुबेर हा जिद्दी युवक, शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षेची तयारी करत राहिला. अनेक अडचणी, आर्थिक संकटे आणि मर्यादा असूनही जुबेरने आपले ध्येय स्पष्ट ठेवले. दिवसरात्र अभ्यास, शारीरिक तयारी आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्याने पोलिस भरतीसाठी कठोर परिश्रम घेतले. अखेर त्याच्या अथक प्रयत्नांना यश आले आणि त्याची महाराष्ट्र पोलिस दलात निवड झाली.

        जुबेरच्या या यशाने केवळ त्याच्या कुटुंबाचा नव्हे, तर संपूर्ण सावखेड तेजन सह पिंपळगाव बुद्रुक गावाचा अभिमान उंचावला आहे. गावातील नागरिक, मित्रपरिवार आणि नातेवाईकांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

     आजच्या तरुणांसाठी जुबेर सैय्यद यांची ही यशोगाथा एक जिवंत उदाहरण ठरली आहे. साधनांची कमतरता असली तरी स्वप्न मोठं असेल, जिद्द प्रबळ असेल आणि मेहनत प्रामाणिक असेल, तर यश नक्की मिळते, हा संदेश त्यांच्या प्रवासातून स्पष्टपणे दिसून येतो.जुबेरचे यश हे केवळ एका तरुणाचे नाही, तर संघर्ष, आईचे त्याग आणि कुटुंबाच्या पाठिंब्याचा विजय आहे,असे भावनिक वातावरण सध्या गावात पाहायला मिळत आहे.