* मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचे उत्साहात उद्घाटन
* ३० मार्चपर्यंत नागरिकांना घेता येणार लाभ
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या विविध लोककल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे, ही काळाची गरज आहे. मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून या योजनांची अचूक माहिती लाभार्थ्यांना मिळाल्यास त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून येईल, असे प्रतिपादन खामगावचे उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी यांनी केले.
शेगांव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी नगर भवनात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 'मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचे' उद्घाटन श्री. पुरी यांच्याहस्ते आज संपन्न झाले. यावेळी ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या प्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी यासेरोद्दीन काझी, उपसंपादक सतिश बगमारे, समाजकल्याण अधीक्षक विलास बघे, नेहा पवार, टीव्ही अँड डिजिटल मीडिया असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष फाहिम देशमुख यांच्यासह पत्रकार, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरी पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक न्यायाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्यपूर्ण आवश्यकता आहे. प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी छायाचित्र प्रदर्शन हे प्रभावी माध्यम आहे. यामुळे केवळ माहितीच मिळत नाही, तर विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये प्रशासनाप्रती विश्वास निर्माण होतो. अनुसूचित जाती, मागासवर्गीय आणि दुर्बल घटकांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांचा जास्तीत जास्त विद्यार्थी व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्हा माहिती अधिकारी काझी यांनी सांगितले की, शासनाच्या योजनांची संपूर्ण माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे प्रदर्शन 30 मार्चपर्यंत दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले राहील. जिल्ह्यातील नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास भेट देऊन शासकीय योजनांची माहिती करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान उपस्थित मान्यवर, अधिकारी कर्मचारी यांनी प्रदर्शनीची पाहणी केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वरिष्ठ लिपिक जयंत वानखडे, ललित ढोकणे, नामदेव गट्टे यांनी विशेष परिश्रम घेतले.
