* बुलढाण्याच्या विष्णुवाडी परिसरातील घटना
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
तब्बल आठ फुटी नागाला सुरक्षितपणे पकडण्यात सर्पमित्र एस. बी. रसाळ यांना यश आले. विष्णुवाडी परिसरात १४ मार्चच्या सांयकाळी ७ वाजेच्या दरम्यान हा थरार बघायला मिळाला.
विष्णूवाडी येथील स्वाभिमान मंडळ डेकोरेशनचे संचालक देशपांडे यांच्या घराचा व आजूबाजूच्या परिसरात काही दिवसांपासून नाग संचार करीत होता. हा साप फारसा कुणाच्या नजरेस पडत नव्हता. घटनेच्या दिवशी साप दिसताच एकदम सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. नाग फणा काढून दंश मारण्याचा प्रयत्न करीत होता. जीवाला धोका वाटल्याने बिळात जाऊन शिरला. सर्वांच्या चेहऱ्यावर भितीचे सावट पसरलेले होते. श्री. देशपांडे यांनी सर्पमित्र श्रीराम रसाळ यांना या घटनेची माहिती दिली. सर्पमित्र रसाळ पाच मिनिटात घटनास्थळी हजर झाले. तोपर्यंत नाग अर्धा बिळात शिरला होता. नागाला पकडण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु होते. परंतु सापाला पकडणे शक्य झाले नाही. आता एकच इलाज होता तो म्हणजे जेसीबीने बिळाचे खोदकाम करणे. जेसीबी बोलावली आणि खोदकाम सुरु झाले. चपळ नाग सुसाट सैरावैरा सरपटू लागला. सर्पमित्र एस.बी. रसाळ यांनी शिताफीने या आठ फुटी नागाला पकडून बरणीबंद केले. देशपांडे परिवाराने सुटकेचा श्वास घेतला. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. या नागाला ज्ञानगंगा अभयारण्यात सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
* सर्पमित्रांमुळे सापांचे संरक्षण* :
सर्पमित्र संघटनांनी ग्रामीण भागापर्यंत चळवळ रुजवलेली आहे. याचा परिणाम म्हणजे साप दिसताच काठी उगारण्याऐवजी त्यास पकडून निसर्गात सोडण्याची मानसिकता वाढली आहे. यामुळे सापांचे संवर्धन आणि संरक्षण होत आहे.वनविभागाने सर्पमित्र व वन्यजीव प्रेमींची माहिती संकलित करुन त्यांची जिल्हास्तरीय समिती नियुक्त करावी. जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या या प्राणीमित्रांच्या विम्याबाबत ठोस कृतीधोरण राबवणे गरजेचे आहे, असे मत सर्पमित्र तथा वन्यजीव संरक्षण व निसर्ग पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष एस.बी. रसाळ यांनी व्यक्त केले.
