दिल्ली : (एशिया मंच न्यूज )
आयुर्वेद, योग, सिद्ध, युनानी आणि होमिओपॅथी पद्धतींचा विकास व जागतिक प्रचार प्रसारात भारताची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. आज आयुष केवळ राष्ट्रीय मर्यादेत सीमित नसून, जागतिक प्रतिबंधात्मक आरोग्य धोरणाचा एक महत्त्वाचा स्तंभ म्हणून उदयास आला आहे.असे प्रतिपादन केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.
तिसरी आंतरराष्ट्रीय आयुष परिषद व प्रदर्शनीचे आयोजन दुबई येथे करण्यात आले आहे या परिषदेचे उद्घाटन 15 फेब्रुवारी भारताचे केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते . या कार्यक्रमाला यूएईमधील भारताचे राजदूत डॉ. दीपक मित्तलजी, दुबई हेल्थ ऑथॉरिटीचे महासंचालक हिज एक्सलन्सी डॉ. अल्वी अलशेख अलीजी, दुबईतील भारताचे कॉन्सुल जनरल सतीश कुमार सिवानजी,
आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. ईसा एम. फतकीजी, उपस्थित होते.
तिसऱ्या आंतरराष्ट्रीय आयुष परिषद व प्रदर्शनीच्या उद्घाटनाचा सन्मान मला मिळत आहे, ही माझ्यासाठी भारतासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगून भारत सरकार आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे भारत आज पारंपरिक ज्ञानपरंपरा आणि जागतिक आरोग्य व्यवस्थेच्या केंद्रस्थानी पोहोचला असल्याचे त्यांनी सांगीतले. आरोग्य म्हणजे केवळ रोगाचा अभाव नव्हे, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक समतोलाची संपूर्ण अवस्था होय, जी निसर्गाशी संतुलन राखून साध्य होत असल्याचे त्यांनी सांगीतले.
दुबई येथील आयुष परिषद ही प्रत्येक वर्षी अधिक लोकप्रिय होत असल्याचे पाहून मला मनस्वी आनंद होत आहे. IACE च्या या तिसऱ्या परिषदेत 1000 हून अधिक नोंदणीकृत प्रतिनिधी, सुमारे 100 प्रदर्शक आणि विक्रमी संख्या असलेले अभ्यागत सहभागी झाले आहेत. हे आयुष पद्धती आणि एकात्मिक आरोग्य सेवांबद्दल वाढत्या जागतिक उत्सुकतेचे प्रतीक असल्याचे त्यांनी म्हटले आहे .
संयुक्त अरब अमिराती सरकार आणि दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या सहकार्याबद्दल मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.
या तिसऱ्या IACE चे विषय – “मन आणि शरीराच्या आरोग्यासाठी आयुष उपचार” – समकालीन आणि जागतिक पातळीवर अत्यंत सुसंगत आहे. आज जग वाढता ताण, मानसिक आरोग्य समस्या आणि जीवनशैलीशी संबंधित विकारांचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत आयुष पद्धती स्वीकारार्ह उपाय प्रदान करतात आणि शरीर, मन व पर्यावरण यांच्यातील परस्पर संबंध अधोरेखित करत असल्याचे केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटले आहे.
आयुषला जागतिक आरोग्य क्षेत्रात विश्वासार्ह व पुराव्याधारित योगदानकर्ता म्हणून स्थापित करतील, असा विश्वास भारताचे केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी यावेळी व्यक्त केला.
