* सर्वोत्तम कामगिरीने उंचावली बुलढाण्याची मान
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
अर्थशास्त्र आणि शिक्षणशास्त्राचे अभ्यासक तुषार डोडिया यांनी 'महेश आयडॉल' स्पर्धेत देशातून दुसरा क्रमांक पटकावला आहे. सर्वोत्तम कामगिरीच्या बळावर मिळवलेल्या यशाने त्यांनी बुलढाण्याची मान उंचावली आहे.
पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरमध्ये महेश प्रोफेशनल फोरमद्वारे रविवार ८ फेब्रुवारी रोजी 'महेश आयडॉल सीझन १४' स्पर्धा संपन्न झाली. स्व.रामेश्वर आसाराम मंत्री यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राष्ट्रीय पातळीवर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेमध्ये देशभरातील विविध राज्यांमधून स्पर्धकांनी सहभाग घेतला. कठीण स्वरूपाच्या परिचय फेरी, प्रोफाइल स्क्रीनिंग व प्रश्न-उत्तर फेरी अशा टप्प्यांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. तुषार डोडीया यांना उपविजेता पुरस्कार प्रदान करण्यात आला. चांदीचे मूळ पदक, ट्रॉफी, स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल तुषार डोडीया यांच्यावर सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांनी यशाचे श्रेय आई-वडील, गुरुजन, मित्र व समाज बांधवांना दिले आहे.
