* 'साहेबां'च्या पोस्टने जागवल्या 'दादां'च्या लग्नाच्या आठवणी...
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
अभिता कंपनीचे सीईओ तथा राजर्षी शाहू परिवाराचे मार्गदर्शक सुनील शेळके यांची फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आहे. शेळके कुटुंबातील २० वर्षांपूर्वीच्या आदर्श विवाहाच्या आठवणी या पोस्टने ताज्या केल्या आहेत. शिव, फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचा वारसा अंगिकारत पन्नास वऱ्हाडी आणि फक्त चहापानावर हा लग्न सोहळा पार पडला होता.
आजकाल लग्न सोहळ्यातील खर्चाची उड्डाणे आणि थाटबाट प्रतिष्ठेची बाब झाली आहे. विवाहांमध्ये लाखोंचा खर्च सामान्य झाला आहे. हुंडा, मानपान, लॉन्स, डेकोरेशन, मेकअप, दागिने, जेवणातील चमचमीत मेन्यू , डीजे, बग्गी अशा झगमगाटावर खिसा खाली होईपर्यंत खर्च केला जातो. भविष्यात आर्थिक चणचण सहन करावी लागली तरी चालेल; मात्र हात आखडायचा नाही, अशी वर आणि वधुकडील मंडळींची मानसिकता झाली आहे. वेळप्रसंगी दागिने, जमीन, शेती विकून किंवा कर्ज काढून मुला-मुलींची लग्न केली जातात. कारण असते प्रतिष्ठा आणि लोक काय म्हणतील..? मात्र हा दोन दिवसाचा मोठेपणा कुटुंबाला आर्थिक संकटाकडे घेऊन जातो. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे.
शिरपूर येथील शेळके कुटुंबाने २० वर्षांपूर्वी रूढी, प्रथा, परंपरांना फाटा देत साध्या पद्धतीने लग्न सोहळा संपन्न करुन समाजापुढे आदर्श ठेवला. राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष तथा वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीपदादा शेळके यांचा ४ फेब्रुवारी २००६ रोजी अत्यंत साध्या पद्धतीने विवाह झाला. डोंगरखंडाळा येथील संभाजी राजे विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत बळीराम पाटील यांची कन्या मालतीताई यांच्यासोबत संदीपदादा शेळके यांनी लग्नगाठ बांधली. स्वातंत्र्यसेनानी दिवंगत उत्तमराव पाटील यांच्यासह मोजकेच वऱ्हाडी लग्नात उपस्थित होते. लग्नात कुठलाच तामझाम नव्हता. फक्त चहापानावर हा मंगल सोहळा संपन्न झाला.
तसे पाहिले तर दोन्ही पार्ट्या तगड्या होत्या. वरपिता भाऊसाहेब शेळके सेवानिवृत्त प्राचार्य, घरी चांगली शेती, नावारुपाला आलेली पतसंस्था, भाऊ सुनील शेळके प्रशासनात उच्च अधिकारी पदावर, सामाजिक, राजकीय क्षेत्रात शेळके कुटुंबाची वेगळी ओळख. दुसरीकडे
वधुपिता बळीराम पाटील त्यावेळची बडी आसामी. जमीन- जुमला, संस्था, समाजकारण, राजकारणात त्यांचे नाव होते. लग्नात वाट्टेल तेवढा खर्च करण्याची ऐपत दोन्ही कुटुंबाकडे होती. परंतु त्यांनी काळाच्या पुढचा विचार केला. महामानवांनी सांगितलेल्या विचारांचा वारसा जोपासत साध्या पद्धतीने विवाह उरकत समाजापुढे आदर्श ठेवला. या लग्नासंदर्भात संदीपदादा शेळके आणि मालतीताई शेळके यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, साध्या पद्धतीने लग्न करण्याचे आम्ही ठरवले होते. दोघेही निर्णयावर ठाम होतो. कुटुंबाकडूनही आम्हाला साथ मिळाली. लग्नाला २० वर्षे झाली असून सुखाने संसार सुरू आहे. मुलगा राजवीर आणि मुलगी गार्गी आमचे विश्व आहे. आज मागे वळून पाहतांना आपण घेतलेल्या निर्णयाचा आम्हाला अभिमान वाटतो. लग्नात जास्त खर्च करण्यापेक्षा भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेच्या नियोजनाला प्राधान्य द्यावे, असा सल्ला आम्ही आजच्या युवक- युवतींना देतो...
