आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मित्रांची आर्थिक मदत* मित्रांनी घेतली मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी


आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मित्रांची आर्थिक मदत
* मित्रांनी घेतली मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
            शिंदी येथील सुनिल उत्तमराव खरात या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी त्यांचे वर्गमित्र समोर आले असून ३० हजारांची मदत पत्नीला सुपुर्द करण्यात आली. त्याचबरोबर मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा खर्चही करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे.
         सुनिल उत्तमराव खरात यांनी १२ जानेवारी रोजी दुपारी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. सुनिल हा शेतकरी होता. शेतात राबराब राबून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. आईच्या नावावर बँकेचे कर्ज होते. ते सतत वाढत गेल्याने आर्थिक विवंचनेत तो जिवन जगत होता. यावर्षी अतिवृष्टीमुळे पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. घरखर्च चालविणे कठीण झाले होते. १२ जानेवारी रोजी त्याने स्वतः घरातच गळफास लावून आत्महत्या केली.
         सुनिल हा हुशार विद्यार्थी होता. बुलढाणा येथे उच्च शिक्षण घेत असताना त्याने अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली होती. याची जाणीव विद्यार्थ्यांना होती. त्यातील अनेक विद्यार्थी शासकीय सेवेत दाखल झाले. परंतू सुनिलची शासकीय सेवेतील संधी हुकली आणि वडीलांचे आकस्मित निधन झाल्यानंतर घरातील कुटुंब प्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आली. कालांतराने आईही जग सोडून गेली. अशा परिस्थितीत तो शेती करीत आपला प्रपंच चालवित होता. त्यांच्या निधनाची बातमी सर्व वर्गमित्रांना कळली. त्यातील सुहास पाटील जानेफळ, संजय सुखदेव जाधव लव्हाळा, अर्जुन मोरे खामगाव, अनिरुद्ध टेकाळे चिखली, समाधान सुगंधाने सावंगिवीर, सुनिल तेलंग मोताळा, सुरेश खिल्लारे उमनगाव, अॅड. मनोहर तायडे नांदुरा, प्रा. के. ओ. शिंगणे बुलडाणा, विजय पवार बुलढाणा, सुभाष विश्वनाथ गवई अॅन्टिकरेप्शन विभाग मुंबई, विनोद खिल्लारे, रुस्तुम चव्हाण, उज्वला चव्हाण, नितीन वायाळ, सरपंच अशोक खरात यांनी एकत्र येऊन ३ फेब्रुवारी रोजी शिंदी येथे येऊन आर्थिक मदत दिली. त्याच बरोबर मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली. समाजातील प्रत्येक व्यक्तिने आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवली तर निश्चितच गरजूंना सहारा मिळणार यात शंका नाही.