प्रहार' दिव्यांग क्रांतीचे लेखी आश्वासनाने उपोषणाची सांगता


प्रहार' दिव्यांग क्रांतीचे लेखी आश्वासनाने उपोषणाची सांगता
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
          दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी  तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील कारभारा विरोधात आक्रमक झालेल्या प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाने  १० फेब्रुवारी रोजी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालया समोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सकांनी आंदोलनाची तात्काळ  दाखल घेत प्रलंबीत मागण्या मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिल्याने दिव्यांग बांधवांनी आपले उपोषण मागे घेतले.

        प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सकांकडे रुग्णालयातील काही डॉक्टर,  दलाल संगनमत करून पैसे घेऊन बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे वाटप करत असल्याचा खळबळजनक आरोप करत सखोल चौकशी करण्यात यावी, दिव्यांग तपासणी कक्षात पारदर्शकता राहावी, यासाठी तेथे रइन कॅमेरार तपासणी करण्यात यावी, कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत. चालता न येणाऱ्या दिव्यांग बांधवांसाठी पुरेशा व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात यावी. गेल्या ५ ते १० वर्षांपासून दिव्यांग बोर्डावर ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची व डॉक्टरांची तत्काळ अदलाबदल करण्यात यावी, नवीन प्रमाणपत्रांसाठीचे ऑनलाईन अर्ज रुग्णालयातूनच मोफत भरून देण्यात यावेत, अशी मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष करीत असल्याने १० फेब्रुवारी रोजी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश पुरी यांच्या नेतृत्वात मुकेश राजपूत, सुरेश सुरोशे, सुरज जंजाळ, महेंद्र मेढे, मोहम्मद निसार मोहम्मद इकबाल, भगवान लेणीकर, श्रीरंग सुरशे, आरिफ खान, जाफर हुसेन, सय्यद जाफर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले होते. त्यांच्या उपोषणाची दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक बिराजदार यांनी उपोषण मंडपाला भेट दिली. दिव्यांग बांधवांसोबत चर्चा करुन मागण्या मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे दिव्यांगांनी आपले उपोषण मागे घेतले.