बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
लहानपणापासून नियमित व्यायाम, योगाभ्यास आणि संतुलित आहाराचा अवलंब केल्यास व्यक्ती निरोगी राहू शकते. मुलांनी बाहेरील जंकफूड, पिझ्झा तसेच रासायनिक पेयांपासून दूर राहून आरोग्याबाबत सजग राहावे. ‘आरोग्य हीच खरी संपत्ती आहे’, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.
शेगाव येथील विसावा मैदानावर चार दिवसीय आरोग्य मेळाव्याचं आयोजन आयुष मंत्रालयाच्या वतीने करण्यात आल आहे आज 27 फेब्रुवारीला शाळकरी विद्यार्थ्यांना पोषण आहार व आरोग्य या विषयावर आयुर्वेदिक बाल आरोग्य तज्ञ वैद्य मैत्रीय सौरभ लिमये यांनी मार्गदर्शन केले तर केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव बोलत होते ते पुढे म्हणाले की, नागरिकांचे आरोग्य सुदृढ आणि निरोगी असल्यास देशाच्या विकासाला गती मिळते. निरोगी नागरिक हीच राष्ट्राची खरी ताकद आहे. मात्र, आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत तरुण वर्ग कामाच्या व्यापामुळे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत आहे. अनियमित दिनचर्या, अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे पुढील काळात विविध आजारांना सामोरे जावे लागते.
उतरत्या वयात जीवनशैलीजन्य आजार वाढत असून, त्यावर उपचारासाठी उत्पन्नाचा मोठा भाग खर्च करावा लागतो, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे तरुणांनी वेळेचे योग्य नियोजन करून नियमित व्यायाम, योग आणि संतुलित आहार यांचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्यदायी सवयी लहानपणापासूनच जोपासल्यास भविष्यातील अनेक व्याधींवर नियंत्रण मिळविता येते. कुटुंब, शाळा आणि समाज यांनीही याबाबत सकारात्मक भूमिका घेत जनजागृती करावी, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.या कार्यक्रमाला विविध शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
