दुर्धर आजारांच्या व्यवस्थापनासाठी युनानी औषधशास्त्राची एक बळकट परिसंस्था उभारत आहे : केंद्रिय आयुष मंत्री प्रतापराव जाधव

दुर्धर आजारांच्या व्यवस्थापनासाठी युनानी औषधशास्त्राची एक बळकट परिसंस्था उभारत आहे :  केंद्रिय आयुष मंत्री प्रतापराव जाधव
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
          सरकार सार्वजनिक आरोग्य, प्रतिबंध आणि दुर्धर आजारांच्या व्यवस्थापनासाठी युनानी औषधशास्त्राची एक बळकट परिसंस्था उभारत आहेत. नवोन्मेष आणि पुरावे या दोन स्तंभांच्या आधारे युनानी औषधशास्त्राच्या भविष्यकालीन युगाला आकार मिळणार आहे, असे प्रतिपादन केंद्रिय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले. 
         मुंबई येथील जे.जे. रुग्णालयातील प्रादेशिक युनानी औषध संशोधन संस्थेंच्या (rrium) नूतनीकरण केलेल्या सह उपचार केंद्र अर्थात को लोकेशन सेंटरचं उद्घाटन आज 14 फेब्रुवारी रोजी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्याहस्ते झाले. या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. मुंबई येथे आयोजीत युनानी दिन 2026 सोहळा आणि इनोव्हेशन अँड एव्हिडन्स इन युनानी प्रॅक्टिस अर्थात युनानी औषधोपचारातील नवोन्मेष आणि सिद्धता या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेत ते अध्यक्ष म्हणूनही सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे आयोजन केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या अखत्यारितील युनानी औषध संशोधन केंद्रीय परिषदेने (ccrum) केले आहे.
प्रादेशिक युनानी औषध संशोधन संस्थेंच्या या नूतनीकृत सह उपचार केंद्राची स्थापना 1984 मध्ये झाली होती. सुमारे 3.84 कोटी रुपये खर्चून आता या केंद्राचे अद्यावतीकरण करण्यात आले आहे. एकात्मिक वातावरणात वैद्यकीय सेवा, संशोधन सुविधा आणि रुग्ण सेवांचा विस्तार करणे हा यामागचा उद्देश आहे.                     ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे असलेल्या जे.जे. रुग्णालय संकुलातील युनानी औषधोपचार सुविधेला बळकटी देणे आणि आधुनिक वैद्यकीय व्यवस्थांच्या सहकार्याने तथ्याधारित संशोधनाला चालना देणे, हे या अद्ययावतीकरणाचे उद्दिष्ट आहे. त्या निमीत्त आयोजीत कार्यक्रमात केंद्रिय आयुष मंत्री बोलत होते. जे.जे. रुग्णालयातील युनानी संशोधन केंद्राचे अद्ययावतीकरण म्हणजे, पारंपरिक औषधोपचार व्यवस्थांना आधुनिक, रुग्ण केंद्रित आरोग्य सेवा आराखड्याचा एक अत्यावश्यक स्तंभ बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दृढ वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे, असे ते म्हणाले. या नूतनीकरण केलेल्या सह-उपचार केंद्रामुळे युनानी आणि पारंपरिक औषधोपचार एकाच छताखाली आले आहेत. यातून रुग्णांना विज्ञानाधिष्ठीत संशोधन आणि तथ्यांचा आधार असलेल्या सुरक्षित, परिणामकारक आणि सर्वांगीण उपचार विषयक सुविधांचा सेवा उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या उपक्रमामुळे आयुष व्यवस्थेला मुख्य प्रवाहातील आरोग्य सेवांसोबत एकात्मिकरण घडवून आणण्याच्या तसेच, सर्वांसाठी सर्वसमावेशक आरोग्यविषयक सेवा सुविधांना चालना देण्याच्या सरकारच्या दृष्टीकोनाला अधिक बळकटी मिळेल असेही ते म्हणाले.
            नवोन्मेष आणि संशोधनाचे महत्वही त्यांनी अधोरेखित केले. युनानी औषधशास्त्र ही समृद्ध वैद्यकीय अनुभवांतून रुजलेली आणि काळाच्या कसोटीवर उतरलेली व्यवस्था आहे. मात्र आपण जगासमोर किती प्रभावीपणे विज्ञाननिष्ठ पुरावे मांडतो, त्यावरच या व्यवस्थेचे भविष्य अवलंबून असल्याचे ते म्हणाले. आरोग्यविषयक समस्यांवर युनानी व्यवस्थेअंतर्गतच्या उपाययोजना आखता याव्यात यासाठी, युनानी औषध संशोधन केंद्रीय परिषद (ccrum) आणि प्रादेशिक युनानी औषध संशोधन संस्थेसारख्या संस्थांनी उच्च गुणवत्तेचे वैद्यकीय संशोधन, औषध प्रमाणीकरण आणि ते प्रत्यक्ष अमलात आणल्या संबंधीच्या अभ्यासाचे काम हाती घेण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
        राष्ट्रीय भारतीय चिकित्सा प्रणाली आयोग (एनएसआयएसएम) च्या अध्यक्षा मनीषा व्ही. कोठेकर यांनी अधोरेखित केले की युनानी, आयुर्वेद, सिद्धा आणि सोवा-रिग्पा या सर्व भारतीय चिकित्सा प्रणालींमधील “विविधतेत एकता” या तत्त्वाचे प्रतीक आहेत. वेगवेगळ्या वैद्यकीय परंपरा आरोग्य व मानवी शरीराकडे भिन्न दृष्टिकोनातून पाहतात, मात्र समाजाच्या कल्याणासाठी सर्वांचा अंतिम उद्देश समान आहे. त्यांनी जे. जे. रुग्णालयातील युनानी सह-स्थापन केंद्राच्या नूतनीकरण व उद्घाटनाचे कौतुक केले तसेच सीसीआरयूएम, आरआरआययूएम आणि आयोजकांचे अभिनंदन करत युनानी पायाभुत सुविधा, शिक्षण, उत्पादन आणि संशोधन बळकट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.
           उद्घाटन कार्यक्रमात विविध संस्थात्मक उपक्रमांचे अनावरण करण्यात आले. त्यामध्ये युनानी औषधोपचारांवरील व्हिडीओ टीझर, सीसीआरयूएम प्रकाशनांचे व परिषद स्मरणिकेचे प्रकाशन, सीसीआरयूएमच्या सहकार्यात्मक वेब पोर्टल व मोबाइल अॅलप्लिकेशन्सचे उद्घाटन, एक आंतरराष्ट्रीय आणि आठ राष्ट्रीय सामंजस्य करारांचे आदान-प्रदान, तसेच मिजाज-ए-इन्सान (मानवी प्रकृती) मूल्यमापनासाठी प्रश्नावलीचे सादरीकरण यांचा समावेश होता. याशिवाय आरआरआययूएम, मुंबई येथील जैवरसायनशास्त्र व पॅथॉलॉजी प्रयोगशाळेला एनएबीएल प्रमाणपत्र प्राप्त झाले असून, त्यामुळे युनानी संशोधनातील गुणवत्ता हमी अधिक मजबूत झाली आहे. राष्ट्रीय युनानी दिनाच्या उद्घाटन सत्राला मोनालिसा दास (संयुक्त सचिव, आयुष मंत्रालय), एम. ए. कासमी (सल्लागार -युनानी, आयुष मंत्रालय), सैयद शाह आलम (संचालक, राष्ट्रीय युनानी वैद्यक संस्था) आणि एन. झहीर अहमद (महासंचालक, सीसीआरयूएम) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.