कुंपणच शेत खाते तेंव्हा...
* गांजा तस्करीत कर्मचाऱ्याच्या अटकेने जिल्हा पोलीसांची प्रतिमा मलीन
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
गांजा तस्करीप्रकरणी बुलढाण्याच्या पोलिस कर्मचाऱ्याला अटक झाल्याने पोलीस विभागाची प्रतिमा मलीन झाली आहे. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलिसांचेच हात गुन्हेगारीत अडकल्याने सवाल उपस्थित होत आहेत.
छत्तीसगड पोलिसांनी बुलढाण्यातील पोलिस नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या प्रदीप मुसादवाले याला अटक केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. छत्तीसगड मधील महासमुंद जिल्ह्यातील कोमाखान पोलिस व अँटी नार्कोटिक टास्क फोर्सने 19 जानेवारी रोजी संयुक्त कारवाई करत सुमारे 950 किलो गांजा जप्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारात या गांजाची किंमत सुमारे 4 कोटी 75 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येते. गांजाने भरलेला आयशर ट्रक (क्रमांक MH 20 EG 3969) जप्त करत, जालना येथील अक्षय पदमाकर भोरजे (26), शुभम बालाजी आवटे (24) या दोघांना अटक करण्यात आली. दोघांविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान या दोन्ही आरोपींच्या मोबाईल कॉल डिटेल्स तपासल्या असता, त्यांचा सतत संपर्क बुलढाण्यातील एका व्यक्तीशी असल्याचे समोर आले. अधिक चौकशी केली असता, हा व्यक्ती बुलढाणा पोलिस दलातील कर्मचारी प्रदीप मुसादवाले असल्याचे उघड झाले. त्यामुळे छत्तीसगड पोलिसांनाही मोठा धक्का बसला. यानंतर छत्तीसगड पोलिसांचे पथक बुलढाण्यात दाखल झाले. 29 जानेवारी रोजी टिव्ही सेंटर परिसरात राहणाऱ्या प्रदीप मुसादवालेला अटक करण्यात आली. विशेष म्हणजे, मुसादवाले याच्यावर यापूर्वीही अँटी करप्शन ब्युरोचा छापा पडल्याची माहिती आहे.
या प्रकरणात बुलढाण्यातील आणखी दोन व्यक्ती सहभागी असल्याचा संशय असून, त्यामध्ये आणखी कोणता पोलिस कर्मचारी आहे की, अन्य कोणी, याबाबत पोलिसांकडून गुप्तता पाळली जात आहे. आतापर्यंत या आंतरराज्यीय गांजा तस्करी प्रकरणात 52 पेक्षा अधिक आरोपींना अटक करण्यात आली असून, या तस्करीचे जाळे ओडिशा, छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात पसरले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
