स्पर्धा परीक्षा व मराठी भाषेचे महत्त्व यावर चर्चासत्र

स्पर्धा परीक्षा व मराठी भाषेचे महत्त्व यावर चर्चासत्र 
बुलडाणा : (एशिया मंच न्यूज )
      राजे छत्रपती कला महाविद्यालय, धामणगाव बढे येथे १३ जानेवारी रोजी मराठी वाड्मय मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करण्यासाठी मराठी भाषेचे महत्त्व समजावे, या उद्देशाने महाविद्यालयात “स्पर्धा परीक्षा व मराठी भाषेचे महत्त्व” या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले.
    याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.अविनाश मेश्राम यांनी प्रमुख वक्ते म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी भाषेचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असून मराठी व्याकरण, शब्दसंग्रह, सारांश लेखन, पत्रलेखन असे भाग विद्यार्थ्यांनी व्यवस्थित अभ्यासावे. स्पर्धा परीक्षेसाठी मराठी व्याकरणाचा सखोल अभ्यास असणे खूप आवश्यक आहे. कारण मातृभाषेतील प्रभुत्वामुळे विचारांची स्पष्टता व आत्मविश्वास वाढतो. असे त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.
    कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून डॉ.नितीन जाधव यांनी स्पर्धा परीक्षा ही तुमच्या विश्वासाची, संयमाची, लढण्याच्या जिद्दीची आणि स्वप्नांना जिवंत ठेवण्याची परीक्षा आहे. आणि मराठी विषय हा स्कोरिंग विषय असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच डॉ. भगवान गरुडे यांनी स्पर्धा परीक्षेत मराठी भाषा अनिवार्य आणि पात्रता स्वरूपाची झाली आहे. इतर विषयात तुम्ही चांगले गुण मिळविले असले तरी तुम्ही मराठीत चांगले गुण मिळवले नाही तर मुख्य परीक्षेच्या पात्रतेसाठी धोका निर्माण होऊ शकतो. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी नियमित व योजनाबद्ध पद्धतीने मराठी भाषेचा अभ्यास करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनील पवार यांनी केले. आभारप्रदर्शन प्रा. महेश नागरे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.