बुलडाणा : (एशिया मंच न्यूज )
घाटा खालून अनेक टिप्परद्वारे बुलडाणा शहरात अवैध वाळू येत आहे. महसूल प्रशासना कडून नियमित कारवाया सुरू असून मंगळवारी रात्री एका टिप्पर चालकाने महसूल प्रशास पथकाच्या नाकी नऊ आणले असता महसूल पथकानेही त्यांचा हिसका दाखवत अखेर टिप्पर जप्त करून बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात लावण्यात आले असून चालक फरार झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, 2 डिसेंबर रोजी न.प.निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीतील कामात व्यस्त असल्याने अधिकारी, कर्मचारी कामामुळे थकलेले असतांना बुलडाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे यांना गुप्त माहीती मिळाली की, मलकापूर रोडने वाळूचा टिप्पर येत आहे. तहसीलदार कुमरे यांनी तत्परता दाखवत आपल्या पथकातील मंडळ अधिकारी अशोक शेळके, तलाठी गोपाल राजपूत, अतुल झगरे, शासकीय वाहन चालक अशोक देवकर यांना जयस्तंभ चौकात रवाना झाले असता रात्री 10.30 वाजेच्या सुमारास समोरून एमएच-28-बीबी-7983 क्रमांकाचा टिप्पर आला असता त्याला थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आले. तो न थांबता भरधाव टिप्पर धाडच्या दिशेने सुसाट वेगाने पळाला.
महसूल पथकाने पाठलाग करून टिप्परला सागवन जवळ थांबवले व रॉयल्टी बाबत विचारणा केली असता रॉयल्टी नव्हती. चालकाला टिप्पर ठाण्यात नेण्याचे सांगितले मात्र चालकाने बुलडाणा-धाड मुख्य मार्गावरच वाळू खाली करून दिली. घटनास्थळावरून टिप्पर घेऊन पसार झाला. महसूल पथकाने पुन्हा टिप्परचा पाठलाग करत कोलवड गावातील महादेव मंदिरा जवळ टिप्पर गाठले. परंतु चालक तेथेचे टिप्पर सोडून अंधारात फरार झाला होता. सदर टिप्पर ताब्यात घेऊन बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात लावण्यात आला आहे. रस्त्यात पडलेली वाळू एका जेसीबी चालकाने विना अनुमती बाजूला केल्याने सदर जेसीबी देखील जप्त करण्यात आली आहे. टिप्पर मालक अमोल सुशिर रा.मलकापूर याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार, अशी माहिती बुलडाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनी आज 4 डिसेंबरला दिली आहे.
