ए आय किंवा गूगल आपल्या आई-वडिलांची जागा घेऊ शकत नाही - वैशाली तायडे* भारत विद्यालयात स्नेहसंमेलनाचे उदघाट्न

ए आय किंवा गूगल आपल्या आई-वडिलांची जागा घेऊ शकत नाही - वैशाली तायडे
* भारत विद्यालयात स्नेहसंमेलनाचे उदघाट्न
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
       प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात त्याचे आई-वडील हे त्याचे प्रथम गुरु असतात. आपण त्यांच्यावर निरपेक्षपणे प्रेम केलं पाहिजे. गुगल किंवा एआय आपल्या आई-वडिलांची जागा कधीच घेऊ शकणार नाही."असे भावनिक आवाहन वैशाली तायडे यांनी भारत विद्यालयामध्ये स्नेहसंमेलनाच्या उदघाट्न प्रसंगी केले.
     29 व 30 डिसेंबर रोजी आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सकाळी 8 वाजता भारत विद्यालयाच्या परंपरेप्रमाणे प्रातःकालीन प्रार्थना व प्रतिमा पूजनाने करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक पी. डी. गायकवाड, उपमुख्याध्यापक मोहन घोंगटे, पर्यवेक्षक नवल गवई तसेच शिक्षिका पूजा बोरे यांनी प्रार्थना व भजनाचे सादरीकरण केले. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या वैशाली तायडे यांचा सत्कार शाळेतील शिक्षिका शारदा एंडोले यांनी शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन केला.
       सकाळच्या बोचर्‍या थंडीच्या वातावरणातून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी कवी सुभाष किन्होळकर लिखित थंडी वाजते ग आई, थंडी वाजते, मला गडे उठायची भीती वाटते ही प्रसंगोचित कविता विद्यार्थ्यांकडून गाऊन घेत स्नेहसंमेलन उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधला. विद्यार्थ्यांना जर परिपूर्ण बनायचं असेल तर त्यांनी सर्वप्रथम स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये शाळा हे महत्वपूर्ण संस्कार केंद्र आहे. विद्यार्थी जीवनामध्ये शाळेचे महत्त्व पटवून देतांना त्यांनी हॅलो हॅलो बोलतोय कोण? माझ्या शाळेचा वाजतोय फोन ही श्रवणीय कविता सादर करून विद्यार्थ्यांची मने जिंकली. विद्यार्थी जीवनामध्ये ज्ञानार्जन करायचे असेल तर विद्यार्थ्यांनी मोबाईल व प्रसार माध्यमांपासून दूर राहणं अत्यंत निकडीचे असल्याचे आवाहन त्यांनी केले. पालक - शाळा - शिक्षक - विद्यार्थी या चार घटकांच्या समन्वयानेच भविष्यात सुजाण नागरिक घडू शकतात असेही त्यांनी सांगितले.
       या उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रसंगी संचालक मंडळाचे सदस्य गजानन एंडोले तसेच माजी कर्मचारी विश्वनाथ सोनुने, सर्व शिक्षक तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
 कार्यक्रमाचे संचालन व प्रमुख पाहुण्यांचा परिचय शाळेचे उपमुख्याध्यापक मोहन घोंगटे यांनी केले. तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक नवल गवई यांनी केले.