* पुजाताई गायकवाड ४७८० मतांनी विजयी ; ३० पैकी २२ नगरसेवक सेनेचे
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या बुलढाणा नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला. तब्बल ४७८० मतांची आघाडी घेत पुजाताई संजय गायकवाड यांनी नगराध्यक्षपदाची लढत जिंकली. एकहाती सत्ता मिळवत शिवसेनेने ३० पैकी २२ नगरसेवक निवडून आणले. बुलढाणेकरांनी विकासकामांना साथ दिली असून त्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू, असे अभिवचन आमदार संजय गायकवाड यांनी दिले.
बुलढाणा नगरपालिकेचा निकाल हा संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख संजय गायकवाड यांच्या सक्षम, ठाम आणि लोकाभिमुख नेतृत्वाखाली शिवसेनेने बुलढाणा नगरपालिकेवर आपला भगवा फडकावला.
या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपाचा दारुण पराभव झाला असून, शिवसेनेने ३० पैकी तब्बल २२ नगरसेवक निवडून आणत निर्विवाद बहुमत मिळवले. हा निकाल म्हणजे विरोधकांसाठी जोरदार धक्का तर शिवसेनेसाठी बुलढाणेकरांनी दिलेला एकतर्फी, ठाम आणि निर्णायक कौल आहे. शिवसेनेच्यावतीने नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असलेल्या पूजाताई संजय गायकवाड यांनी निवडणूक रणांगणात उतरून सर्व विरोधकांना चारही मुंड्या चित केले. काँग्रेसच्या लक्ष्मीताई काकस यांचा तब्बल ४७८० मतांनी पराभव करीत दणदणीत विजय संपादन केला. हा विजय केवळ मतांच्या आकड्यांचा नसून, विकास, विश्वास आणि सक्षम नेतृत्वावर बुलढाणा शहरवासीयांनी उमटवलेली ठाम मोहोर मानली जात आहे.
या निकालामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की, आमदार संजय गायकवाड यांच्यावर बुलढाणेकरांचा विश्वास कायम आहे. विजयानंतर बुलढाणा शहरात भव्य विजय रॅली काढण्यात आली. शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी तसेच हजारो शिवसैनिकांनी ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि भगवा झेंडा फडकावत हा विजय जल्लोषात साजरा केला.
* विरोधकांना चिंतन करायला लावणारा निकाल :
बुलढाणा नगरपालिकेचा निकाल विरोधकांना चिंतन करायला भाग पडणारा ठरला. शिवसेनेने विरोधकांना चित करीत ३० पैकी २२ जागांवर विजय मिळवला. तर काँग्रेसचे २, शरद पवार राष्ट्रवादी गटाचे २, भाजपाचे २ तर २ नगरसेवक अपक्ष निवडून आले.
