जिल्ह्यात सीओपीडी रुग्णसंख्येत वाढ * धूम्रपानामुळे फुफ्फुसाच्या गंभीर आजार : काळजी घेण्याचे डॉ. दीपक काटकर यांचे आवाहन

जिल्ह्यात सीओपीडी रुग्णसंख्येत वाढ * धूम्रपानामुळे फुफ्फुसाच्या गंभीर आजार : काळजी घेण्याचे  डॉ. दीपक काटकर यांचे आवाहन
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
         जिल्ह्यात सीओपीडी (क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज) या फुफ्फुसाच्या गंभीर आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य विभागात चिंता वाढली आहे. बिडी-सिगारेटचे व्यसन आणि प्रदूषणामुळे नागरिकांच्या फुफ्फुसांवर गंभीर परिणाम होत असून अनेकांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी सतत घटत आहे. ही धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन बुलढाण्यातील सुप्रसिद्ध फुफ्फुसरोग तज्ञ डॉ. दीपक काटकर यांनी नागरिकांना धूम्रपान तात्काळ सोडण्याचे आणि फुफ्फुसांचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे.

        जागतिक सीओपीडी दिनानिमित्त जनजागृती दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात ओपीडीविषयी जनजागृती मोहीम राबवली जाते. यावर्षी १९ नोव्हेंबर रोजी 'शॉर्ट ऑफ ब्रेथ, थिंक सीओपीडी' या थीमवर जागतिक सीओपीडी दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने जिल्ह्यात विविध आरोग्य शिबिरे, जनजागृती कार्यक्रम आणि मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले.

* सीओपीडी म्हणजे काय?
          सीओपीडी हा फुफ्फुसांचा एक जुनाट आणि प्रगतिशील आजार असून हवेच्या मार्गात अडथळा निर्माण होतो व श्वास घेताना त्रास होतो. सामान्य भाषेत याला काळा दमा म्हणूनही ओळखले जाते. दम्यापेक्षा भिन्न आजार : दम्यात श्वासावर नियंत्रण मिळवता येते; पण सीओपीडी हा बहुतेकदा दीर्घकालीन धूम्रपान, प्रदूषण व धुळीच्या संपर्कामुळे होणारा कायमचा आजार आहे.
       Bbसामान्य लक्षणे : सततचा खोकला, श्वास घेताना धाप लागणे, छातीत दडपण किंवा दुखणे, थकवा, वारंवार होणारे श्वसनाचे संक्रमण असे आहेत.
* मुख्य कारणे : बिडी, सिगारेट, तंबाखूचे सेवन, घरातील किंवा बाहेरील प्रदूषित हवा, कारखान्यांतील धातू/धूळ/रसायने वारंवार होणारे फुफ्फुसांचे संसर्ग डॉ. काटकर यांच्या माहितीनुसार धूम्रपान करणाऱ्यांमध्ये सीओपीडीचा धोका धूम्रपान न करणाऱ्यांपेक्षा दहा पट अधिक असतो. अनेक तरुणांमध्येही हा आजार निदान होत आहे, ही चिंतेची बाब आहे.
* धोक्याची घंटा : ऑक्सिजनची पातळी घटतेय सीओपीडी वाढल्यामुळे रुग्णांच्या रक्तातील ऑक्सिजन पातळी कमी होते. यामुळे शरीरातील अवयवांवर ताण येतो व गंभीर परिस्थितीत रुग्णाला सतत ऑक्सिजन सपोर्टची गरज भासू शकते. जिल्ह्यात अशा रुग्णांची संख्या गेल्या काही महिन्यांत वाढल्याची नोंद आरोग्य विभागाने केली आहे.

* प्रतिबंध आणि उपाययोजना : 
          डॉ. दीपक काटकर यांनी नागरिकांना खालील उपाय त्वरित अवलंबण्याचे आवाहन केले आहे.
यामध्ये धूम्रपान पूर्णपणे बंद करा, सीओपीडीचा सर्वात मोठा धोका धूम्रपान आहे. बिडी किंवा सिगारेट सोडल्यास फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते आणि आजाराचा वेग कमी होतो. लसीकरण घ्या : फ्लू व निमोनिया लस घेतल्यास श्वसनाचे संक्रमण कमी होऊन सीओपीडीची लक्षणे नियंत्रणात राहू शकतात, नियमित व्यायाम आणि श्वसनक्रिया प्राणायाम, चालणे, हलका व्यायाम हे फुफ्फुसांना अधिक कार्यक्षम ठेवतात,  प्रदूषणापासून बचाव : धूळ, धूर आणि रसायनयुक्त वातावरण टाळावे, आवश्यक असल्यास मास्कचा वापर करावा,  नियमित फुफ्फुस तपासणी स्पायरोमेट्री/पीएफटी चाचणीद्वारे आजाराचे लवकर निदान शक्य आहे. लवकर निदान म्हणजे अधिक प्रभावी उपचार हे आहे.

* डॉ. दीपक काटकर यांचे नागरिकांना आवाहन
         जिल्ह्यात सीओपीडीचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत आहे. बिडी-सिगारेट सोडा नाहीतर शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होत जाऊन गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. लक्षणे दिसताच त्वरित आपल्या जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि योग्य उपचार घ्या, असे आवाहन डॉ. काटकर यांनी प्रसार माध्यमाशी बोलतांना केले.