आर्थिक साक्षरता अभियान ग्रामीण अर्थकारणातील मैलाचा दगड- संदीपदादा शेळके

आर्थिक साक्षरता अभियान ग्रामीण अर्थकारणातील मैलाचा दगड- संदीपदादा शेळके
नांदुरा : (एशिया मंच न्यूज )
       पैसा योग्य आणि प्रामाणिक मार्गानेच कमवावा. त्याचा योग्य वापर करावा. पैसा योग्य मार्गाने खर्च करावा आणि त्याचा दुरुपयोग टाळावा, असा उपदेश संत तुकारामांनी ४०० वर्षांपूर्वी आपल्या अभंगातून केला आहे. आपण त्यांच्या उपदेशाचे पालन करुन पैशाचे महत्व समजून घेतले पाहिजे. यानुषंगाने सुरु केलेले आर्थिक साक्षरता अभियान ग्रामीण अर्थकारणातील मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके यांनी व्यक्त केला. 

         राजर्षी शाहू मल्टिस्टेट आर्थिक साक्षरता अभियानांतर्गत तालुक्यातील मामूलवाडी येथे २१ नोव्हेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर सरपंच विजय पाटील, ॲड.अतुल पाटील, अशोक तायडे, बाळू तोंडे, सोपान पाटील, माजी सरपंच जगन्नाथ पाटील, दयाराम तायडे, पोलीस पाटील संदीप पाटील, ओंकार भगेवार, विश्वनाथ गावंडे, विठ्ठल गावंडे यांची उपस्थिती होती.              पुढे बोलतांना ते म्हणाले, शेती, लघु उद्योग, दुग्ध उत्पादन, गृह उद्योग, पशुपालन यासह छोट्या-मोठ्या व्यवसायाने ग्रामीण भागातील अर्थकारणाला बळकटी देण्याचे काम केले आहे. यामाध्यमातून गावात पैसा येतो. मात्र त्याचा योग्य वापर होत नसल्याने विकास साधला जात नाही. ही परिस्थिती कुठे तरी बदलली पाहिजे. आपला पैसा कसा वाढेल, यादृष्टीने सर्वांनी विचार करायला हवा. त्यामधून नक्कीच चांगला मार्ग निघतो. आपल्या उन्नतीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध असून प्रत्येक क्षणी आपल्यासोबत असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

         आर्थिक विषयाचे अभ्यासक तुषार डोडिया यांनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. आज पैसा प्रत्येक जण कमावतो. कुणाची कमाई जास्त असेल तर कुणाची कमी. मात्र योग्य मार्गदर्शन आणि नियोजन केल्यास कमी पैशातून सुद्धा विकास साधता येतो. राजर्षी शाहू मल्टिस्टेटने सुरु केलेल्या आर्थिक साक्षरता अभियानाने जीवनात भरभराट आणण्याची संधी उपलब्ध केली आहे. याचा पुरेपूर लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्य शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.