* धामणगाव बढे येथील राजे छत्रपती कला महाविद्यालयात चर्चासत्र
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
मनुष्य जीवनभर अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणूनच जगत असतो. लहानपणापासून ते वृद्ध होईपर्यंत अर्थशास्त्र सोडून जगता येत नाही. कळत न कळत अर्थशास्त्राचे सिद्धांत दैनंदिन जीवनात वापरावेच लागतात, असे प्रतिपादन मोताळा येथील श्री शिवाजी विद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पी. आर. चाटे यांनी केले.
मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथील राजे छत्रपती कला महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागांतर्गत 'अर्थशास्त्राचे जीवनातील स्थान : वर्तमानातील बदल' या विषयावर आयोजित एकदिवसीय चर्चासत्रात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून इतिहास अभ्यासक प्रमोद टाले होते. अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश मेश्राम यांनी भूषवले. प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा. डाॅ. महादेव रिठे यांनी चर्चासत्राचे आयोजन करण्यामागील हेतू व पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रमुख अतिथी प्रमोद टाले यांनी भूतकाळातील आणि वर्तमान आधुनिक युगातील अर्थशास्त्र यामध्ये झालेला बदल याबाबत विचार व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अविनाश मेश्राम यांनी वर्तमानातील अर्थार्जन व जीवनातील आर्थिक तत्वे याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे वैष्णवी गायकवाड, सोनिया वल्हे, खुशी कुळे, सरिता बढे, सहल एकता जाधव मनवी कोठाळे, हर्षल शिप्पलकर, शे.एजाज, अस्मिता पाचपोळ, खुशी भुसारी, सरिता घोती, साक्षी माळोदे, अभय पिसे, गणेश सोनोने यांनी परिश्रम घेतले. संचालन सरिता बढे व आभार आदित्य चव्हाण यांनी मानले.