खामगांव-जालना रेल्वे मार्गासंदर्भात केंद्रिय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांची केंद्रियमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली भेट * रेल्वे प्रकल्पाला तात्काळ मंजुरात देण्याची केली आग्रही मागणी

खामगांव-जालना रेल्वे मार्गासंदर्भात केंद्रिय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांची केंद्रियमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली भेट 
* रेल्वे प्रकल्पाला तात्काळ मंजुरात देण्याची केली आग्रही मागणी
 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        इंग्रज काळापासुन बहुप्रतिक्षीत असलेल्या आणि राज्य सरकारने 50 % खर्चाला मंजुरात दिलेल्या खामगांव-जालना रेल्वे मार्गाच्या कामाला त्वरीत मंजुरात देऊन मान्यता प्रदान करावी, अशी आग्रही मागणी केंद्रिय रेल्वेमंत्री आश्विनी वैश्णव यांच्याकडे केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे. 
        इंग्रजकाळापासुन प्रलंबीत असलेला खामगांव-जालना हा रेल्वे मार्ग व्हावा, अशी अपेक्षा बुलढाणा लोकसभा मतदार संघातील नागरीकांची आहे. या संदर्भात 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खामगांव येथे झालेल्या जाहीर सभेत हा प्रकल्प जलद गतीने पुर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. महाराष्ट्र सरकारने 15 मार्च 2024 रोजी या रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी लागणाऱ्या 50 % खर्चाच्या मान्यतेला मंजुरात प्रदान करुन हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाकडे पाठविला आहे. या रेल्वेमार्गाच्या प्रस्तावावर तात्काळ निर्णय घेऊन या प्रकल्पाला मंजुरात प्रदान करावी. अशी मागणी केंद्रिय आयुष आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्हयाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी 24 सप्टेंबर रोजी दिल्ली येथे 
केंद्रिय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्षात भेट घेऊन केली आहे. या संदर्भाचे मागणी पत्रही केंद्रिय रेल्वेमंत्र्याना दिले आहे. 
       या पत्रात त्यांनी नमुद केले आहे की, बुलढाणा जिल्हयातील खामगांव-जालना रेल्वे मार्ग व्हावा, अशी माझ्यासह जिल्हयातील नागरीकांची अपेक्षा आहे. हा मुद्दा विकासासोबतच लोकभावनेचा सुध्दा आहे. हा रेल्वे मार्ग विदर्भ मराठवाडा या दोन विभागांना जोडणारा आहे. शिवाय मध्य आणि दक्षीण रेल्वे मार्गांनाही जोडणारा ठरणार असुन सध्या प्रलचित असलेल्या मध्य आणि दक्षिण रेल्वे मार्गातील अंतर कमी करणारा ठरणार आहे. 
        बुलढाणा जिल्हयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थळ आहे. लोणार येथे खाऱ्या पाण्याचे जगविख्यात सरोवर आहे. तर शेगांव येथे श्री. संत गजानन महाराजांचे समाधी स्थळ आहे. या एैतीहासीक,धार्मीक, आणि पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी देश विदेशातुन पर्यटक येत असतात. या रेल्वे मार्गामुळे व्यापार पर्यटन आणि कृषी उत्पादनासोबतच औद्योगीक विकासाला चालना देणारा ठरणार आहे. या रेल्वेमार्गासंदर्भात रेल्वे लोक आंदोलन समितीचे सदस्य, जिल्हयातील नागरीक, विविध सामाजीक संघटना, लोकप्रतिनीधी मला भेटतात.  खामगांव-जालना रेल्वे मार्गासंदर्भात आस्थेने विचारपुस करतात. हा मार्ग अनेक दिवसापासुन प्रलंबित असल्याबद्दल चिंताही व्यक्त करतात. आपले सरकार सबका साथ सबका विकास करणारे सरकार असल्याने खामगांव-जालना रेल्वे मार्गासंदर्भातील आपल्या मंत्रालयाकडे प्रलंबित असलेल्या खामगांव-जालना रेल्वे मार्गाला तात्काळ मंजुरात दयावी, अशी आग्रही मागणी या भेटी दरम्यान केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. या मागणीला रेल्वेमंत्र्यांनीही सकारत्मकता दर्शविली आहे.