बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
मोताळा येथील सेवागिरी बाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये २५ सप्टेंबर रोजी अंत्योदय दिन व पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी करण्यात आली.
अध्यक्षस्थानी प्राचार्य सहदेव गंगावणे होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राजे छत्रपती कला महाविद्यालयाचे प्रा. डॉ. महादेव रिठे, स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य अमोल किरोचे मंचावर उपस्थित होते. प्रारंभी प्रतिमा पुजन व स्वागत गीत झाले. जयंतीनिमित्त आयोजित विविध स्पर्धांची बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलतांना प्रा. रिठे यांनी पंडित दीनदयाळ यांच्या जीवन व कार्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांच्या कर्तृत्वाचा आढावा, महाविद्यालयीन जीवनात केलेले समाजकार्य, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य आणि जनसंघाच्या स्थापनेमध्ये त्यांची भूमिका याबाबत विचार मांडले. तसेच एकात्म मानव दर्शनाबाबत मागोवा घेण्यात आला. माणसाच्या सुखाचा विचार केला असता शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा यांच्यातील समन्वयाचा विचार एकात्म मानव दर्शनामध्ये सांगितल्याचे प्रा.रिठे यांनी स्पष्ट केले. पं. दीनदयालजींचा नारा, 'हर हात को काम, हर खेत को पाणी' हा अंत्योदय विचाराला पूरक असाच आहे. तर 'सबका साथ सबका विकास' हे अंत्योदयाचे एक प्रकारे प्रकटीकरणच आहे. शरीर, मन, बुध्दी आणि आत्मा यांचे उपभोगाबरोबर संयम आणि समर्पण यांच्या अधिकाराबरोबर कर्तव्याचे व्यक्तीबरोबर समष्टी, सृष्टी आणि परमेष्टीचे अखंड अवधान ठेवून चालणारे एकात्म सुख म्हणजे एकात्म मानव दर्शन होय.
अध्यक्षीय मनाोगतामध्ये प्राचार्य गंगावणे यांनी विद्यार्थ्यांनी पंडित दीनदयाळ यांच्या विचारांच्या आधारे जीवन घडवून देशाच्या विकासात योगदान देण्याची तयारी केली पाहिजे, असे मत व्यक्त केले. संचालन संस्थेचे निदेशक अनंत पाटील यांनी तर आभार अस्मिता बागडे यांनी मानले.