* बुलढाणेकरांचा आक्रोश मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
मयुरी गौरव ठोसर प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करीत फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी आक्रोश मोर्चाद्वारे बुलढाणा शहर नागरिक समन्वय समितीच्या वतीने आज २३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. सदर आक्रोश मोर्चाला शहरातील संगम चौक येथील शिवस्मारकापासून सुरुवात होऊन पुढे तो मोर्चा शहरातील मुख्य रस्त्यावरून मार्गक्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
बुलढाणा शहर नागरिक समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, १० सप्टेंबर रोजी जळगांव जिल्हयातील सुंदर मोती नगर जळगांव खांदेश येथिल मयुरी गौरव ठोसर ह्या २३ वर्षीय नवविवाहीत महिलेने सासरच्या मंडळी कडून होणाऱ्या त्रासामुळे, सततच्या छळाला कंटाळुन आत्महत्या केली. या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे. तिची आत्महत्या नसून सासरच्या मंडळी कडून तिची हत्याच करण्यात आलेली आहे. उच्चशिक्षित तरुणीची लग्नाच्या लगाच्या अवघ्या चार महिण्यात अशी निर्दयी घटना घडते, ही लाजीरवाणी बाब आहे. हुंडा प्रथा व स्त्रियांवरील छळ ही आपल्या समाजाच्या प्रगतीस बाधक बाब आहे. या प्रकरणात आरोपींना अटक झालेली असून, सर्व संबंधित आरोपींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. सदर प्रकरणी सासरकडील सर्व मंडळीं पती-गौरव ठोसर, गणेश किशोर ठोसर, किशोर ठोसर, लता किशोर ठोसर यांचेवर जलद गती न्यायालया मार्फत खटला सुरु करून आरोपींना योग्य ती कठोर शिक्षा देण्यात यावी. एकाही आरोपीची जमानत मंजुर होऊ नये. जिल्हा प्रशासनाने जनजागृती मोहिम राबवुन अशा अमानुष घटनांना आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर बुलढाणा शहर नागरिक समन्वय समितीच्या सदस्यांचे व विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मंडळीच्या स्वाक्षरी आहे. यावेळी शेकडो बुलढाणेकरांची उपस्थिती होती.