ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरची मर्यादा न लावता १००% नुकसान भरपाई द्या - रविकांत तुपकर* सोमठाणा, शिंदीसह इतर गावांमध्ये केली नुकसानीची पाहणी

ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरची मर्यादा न लावता १००% नुकसान भरपाई द्या - रविकांत तुपकर
* सोमठाणा, शिंदीसह इतर गावांमध्ये केली नुकसानीची पाहणी
 बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
             संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात पावसाने कहर केला आहे. विशेषतः मेहकर, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, लोणार, चिखली या तालुक्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. या अतिवृष्टीने शेतजमिनीचे, पिकांचे, विहिरींचे, अनेकांच्या घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने पंचनाम्याचा गोंधळ न घालता शेतकऱ्यांना सरसकट व विनाअट १००% नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. तुपकर यांनी आज 20 ऑगस्ट रोजी सिंदखेडराजा व चिखली तालुक्यातील गावांमध्ये नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला.
          आधीच सुलतानी संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आता अस्मानी संकटाचा देखील मोठा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांसमोर एका मागून एक संकटांची मालिका सुरूच आहे. गेल्या तीन दिवसांपासून सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. मेहकर, लोणार या दोन तालुक्यांना अतिवृष्टीने अक्षरशः धुवून काढल्यानंतर आता सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, चिखली या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीने कहर केला आहे. नदी नाल्यांना प्रचंड असा पूर येऊन नद्यांचे पाणी शेतांमध्ये तसेच गावांमध्ये शिरल्याने प्रचंड असे नुकसान झाले आहे. शेकडो हेक्टरवरील शेतजमिनी खरडून गेल्या, उभी पिके पावसात वाहून गेली, अनेकांच्या विहिरी खचल्या, शेतातील गोठे पडले, पुरात वाहून गेल्याने अनेक जनावरे दगावली तर काही गावांमध्ये पाणी घुसल्याने अनेक घरांची पडझड झाली, अन्नधान्य व इतर साहित्य वाहून गेले तर अनेकांचे संसार उघड्यावर आले. या अतिवृष्टीने प्रचंड असे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सिंदखेडराजा व चिखली तालुक्यातील विविध गावांमध्ये नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला.
        सिंदखेड राजा तालुक्यातील शिंदी गावात पावसाने मोठा कहर केला. या गावातील 26 घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या गावात देखील रविकांत तुपकर यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच चिखली तालुक्यातील सोमठाणा यासह इतर गावांमध्ये देखील रविकांत तुपकर यांनी प्रत्यक्ष जाऊन नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांची संवाद साधला व त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांची बिकट अवस्था पाहता शासनाने शेतकऱ्यांप्रती आपुलकी आणि सहानुभूती दाखवून त्यांना नुकसान भरपाई व थेट मदत देण्याची नितांत गरज आहे. गेल्या वर्षी शेतमालाला भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांना कर्ज काढून, उसनवार करून पेरणी करावी लागली. त्यातच हुमणी अळीने सोयाबीनचे आधीच मोठे नुकसान केलेले आहे, त्यात आता अधिवृष्टीने कहर करून प्रचंड असे मोठे नुकसान केले आहे. शासनाने आता पंचनामांचा गोंधळ न घालता बुलढाणा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना विनाअट व सरसकट नुकसान भरपाई आणि मदत त्यांच्या खाती जमा करावी, अशी आग्रही मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे, अन्यथा मोठे आंदोलन उभे करू असा इशाराही तुपकर यांनी दिला आहे.