राजर्षी शाहू सोशल फाऊंडेशनची सलग दुसऱ्यांदा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद !
* एका वर्षात तीन हजार पिशव्या रक्त संकलनाचे भगीरथ कार्य
* इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून संदीपदादा शेळके, मालतीताई शेळके सन्मानित
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
एका वर्षात तीन हजार पिशव्या रक्त संकलित करण्याची किमया राजर्षी शाहू सोशल फाऊंडेशनने गतवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा केली आहे. या भगीरथ कार्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये सलग दुसऱ्यांदा नोंद झाली आहे. शनिवार २ ऑगस्ट रोजी संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके, संस्थाध्यक्षा मालतीताई शेळके यांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सच्यावतीने सन्मानित करण्यात आले.
गत १५ वर्षांपासून रक्तदान चळवळीत राजर्षी शाहू सोशल फाऊंडेशन आणि राजर्षी शाहू मल्टिस्टेटचे भरीव योगदान आहे. रक्ताचा तुटवडा जाणवताच संस्थेकडून रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते. वर्षभरात १०० हुन जास्त रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. दीड दशकापासून आयोजित करण्यात येत असलेल्या शिबिरांमधून आजपर्यंत १७ हजार पिशव्या रक्त संकलित झाले आहे. वेगवेगळ्या रक्तपेढीच्या माध्यमातून या रक्ताचा गरजू रुग्णांना पुरवठा करण्यास मदत झाली आहे.
आपण पाहतो की, दरवर्षी रक्ताचा तुटवडा जाणवतो. रक्तपेढीत रक्त उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय होते. अशावेळी राजर्षी शाहू सोशल फाऊंडेशनने नेहमीच पुढाकार घेतला आहे. रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध झाले पाहिजे याकरिता वेळोवेळी रक्तदान शिबिरे आयोजित केली आहेत. याशिवाय विविध सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. संस्थेच्या कार्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसने दखल घेतली याचा अभिमान आहे. तर वाढदिवसाच्या औचित्यावर सन्मान मिळाल्यामुळे आनंद द्विगुणित झाल्याच्या भावना मालतीताई शेळके यांनी व्यक्त केल्या.