लावा मराठी पाटी नाहीतर मनसे घेईल दुकानदारांच्या गाठीभेटी..* सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाची एका आठवड्यात अंमलबजावणी करा : अमोल रिंढे पाटील

लावा मराठी पाटी नाहीतर मनसे घेईल दुकानदारांच्या गाठीभेटी..
* सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाची एका आठवड्यात अंमलबजावणी करा : अमोल रिंढे पाटील
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
         सर्वोच्च न्यायालयाच्या २०२३ मधील निर्देशानंतर राज्यातील दुकाने आणि आस्थापनांवर मराठी पाट्या लावणे बंधनकारक आहे. मात्र आजही बुलढाणा शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुकानावर बिनधास्तपणे इंग्रजी पाट्या दिसत आहेत. मराठी पाट्यांच्या समानार्थ मनसेने कायमच आक्रमक पवित्र घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाची एका आठवड्यात अमलबजावणी करा, नाहीतर इंग्रजी पाट्या असणाऱ्या दुकानदारांच्या गाठीभेटी मनसे घेईल, असा इशारा बुलढाणा मनसे तालुकाध्यक्ष अमोल रिंढे पाटील यांनी दिला आहे.

        बुधवार 13 ऑगस्ट रोजी काढलेल्या प्रसिद्धिपत्रकात अमोल रिंढे पाटील यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यात मराठी पाट्या लावण्याची मोहीम संथ झाली आहे. यातून व्यावसायिकांचे आणि आस्थापनांचे फावले. त्यांनी आपल्या दुकानांवर मोठ्या अक्षरात इंग्रजी नावे लिहिली आहेत. डिजिटल आणि विविध फाँटमधील इंग्रजी अक्षरांनी त्याला अंकीत केले. सर्वसामान्य मराठी नागरिकांना ही नावे वाचताही येत नाहीत. मराठी भाषेचे संवर्धन आणि मराठी माणसांसाठी मनसे कायम धावून आली आहे. दुकानदारांनी दुकान आणि आस्थापनावरील इंग्रजी पाट्या एका आठवड्यात बदलाव्या. अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर देण्यात येईल, असा इशाराही बुलढाणा मनसे तालुकाध्यक्ष अमोल रिंढे पाटील यांनी दिला आहे.

..... अन्यथा मनसे स्टाईलचा अवलंब करू : अमोल रिंढे पाटील

        इंग्रजी पाट्या असणाऱ्या दुकानदारांना एका आठवड्याचा कालावधी दिला आहे. मराठी पाट्यासाठी मी या अगोदर केलेली आंदोलने यशस्वी झालेली आहे. यापुढेही तीच आक्रमक भूमिका कायम राहणार आहे. दुकानदारांनी इंग्रजी पाट्या काढल्या नाहीतर मनसे स्टाईलचा अवलंब करू, असेही बुलढाणा मनसे तालुकाध्यक्ष अमोल रिंढे पाटील यांनी सांगितले.