मुंबई : (एशिया मंच न्यूज )
महाराष्ट्रात पत्रकारांवरील हल्ल्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या केवळ दोन दिवसांत चार पत्रकारांवर झालेल्या भ्याड, अमानुष आणि लोकशाहीविरोधी हल्ल्यांनी पत्रकारिता हादरून गेली आहे. कर्जत, नेवासा, अकोला आणि बदलापूर येथे घडलेल्या या सलग घटनांमुळे राज्यातील पत्रकार सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कर्जत तालुक्यातील निष्पक्ष पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे पत्रकार शंकर नाबदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या तिघा पत्रकारांवर स्थानिक पातळीवर हल्ला करण्यात आला. अकोला जिल्ह्यातील पत्रकार सज्जाद हुसेन आणि त्यांच्या कुटुंबीयांवर निर्घृण मारहाण झाली, तर बदलापूर येथील पत्रकार कमाल शेख यांच्यावरही गंभीर हल्ला झाला.
या घटनांच्या पार्श्वभूमीवर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’चे संस्थापक व आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ठोस मागण्या केल्या. “हा केवळ योगायोग नाही; राज्यात एक भयाचं वातावरण निर्माण केलं जात आहे. जनतेच्या समस्या, सत्तेतील गोंधळ आणि भ्रष्टाचारावर लिहिणाऱ्या पत्रकारांना गप्प बसवण्यासाठी थेट शारीरिक हल्ले होत आहेत. हे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.
‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या ठाम मागण्यांमध्ये – पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत तातडीने गुन्हा दाखल करून दोषींना कठोर शिक्षा करणे, प्रत्येक जिल्ह्यात ‘Journalist Safety Cell’ स्थापन करणे, पत्रकारांवर हल्ला हा नॉन-बेलेबल व गंभीर गुन्हा घोषित करणे आणि हल्लाग्रस्त पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक व कायदेशीर मदत देणे – या गोष्टींचा समावेश आहे.
मुख्यमंत्री महोदय, हे केवळ चार प्रकरणांचे प्रकरण नाही, तर हा एक इशारा आहे. जर राज्य सरकारने ठोस पावले उचलली नाहीत, तर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ राज्यभर रस्त्यावर उतरतील. पत्रकार हे लोकशाहीचे प्रहरी आहेत. त्यांच्या हातातील पेन मोडणं म्हणजे लोकशाहीची पाठ मोडणं होय. भाजप सरकार आल्यापासून पत्रकारांवरचे हल्ले वाढले आहेत. मुख्यमंत्री, तुम्ही निर्णय घ्या नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू,” असा अल्टिमेटम संदीप काळे यांनी दिला.
दरम्यान, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ वतीने या महिन्यात महाराष्ट्रात ‘पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती’ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे.