* केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव करणार स्वागत
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
नागपुर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला संत नगरी शेगांव मध्ये थांबा मिळवुन देण्याचे काम केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे. 10 ऑगस्ट ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या रेल्वेला हिरवी झेंडी दाखविण्यात येणार आहे. तर संतनगरी शेगांव येथे स्वागतासाठी केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव उपस्थिती राहणार आहेत.
देशांतर्गत रेल सेवेला गतीमान करण्याच्या दृष्टीकोनातुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत रेल सेवा सुरु केली आहे. अत्यंत जलद आणि लोकांना आधुनिक सुख सुविधा देणारी भारतीय बनावटीची वंदे भारत रेल्वे 10 ऑगस्ट पासुन नागपुर ते पुणे दरम्यान धावणार आहे. या वंदे भारत रेल्वेमुळे नागपुर-पुणे हे दोन महानगर दळणवळणासाठी जोडण्याचे काम केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. या वंदेभारत रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुरदृष्य प्रणालीव्दारे हिरवी झेंडी दाखविणार आहे. त्यानंतर ही रेल्वे अजनी, नागपुर, वर्धा, बडनेरा, अकोला, नंतर विदर्भाची पंढरी म्हणुन ओळख असलेल्या बुलढाणा जिल्हयातील संतनगरी शेगांव येथे दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास धडकणार आहे. वंदेभारत रेल्वेच्या स्वागतासाठी खुद्द केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव उपस्थित राहणार आहे. या रेल्वेला शेगांव येथे थांबा मिळवुन देण्यासाठी त्यांनी केंद्रिय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांची भेट घेवुन हा थांबा मंजुर करुन घेतला आहे.
बुलढाणा लोकसभा मतदार संघातील शेगांवचे संत गजानन महाराज संस्थान संपुर्ण देशामध्ये प्रसिध्द आहे. देशभरातुन लाखो भाविक संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगांव नगरीमध्ये येत असतात. पुणे आणि नागपुर हे दोन्ही महानगर हवाई सेवेशी जोडलेले आहे. या महानगरातुन देश-विदेशातुन येणाऱ्या संत गजानन महाराजांच्या भक्तांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन देणारी हि वंदे भारत रेल्वे ठरणार आहे.
भाविकांच्या आणि मतदार संघातील नागरीकांच्या सुविधेसाठी केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी वंदे भारत ट्रेनला शेगांव येथे थांबा मिळवुन दिल्याने तिचा लाभ भक्तांसोबत जिल्हयातील नागरीकांनाही होणार आहे. केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हावासीयांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रिय रेल्वे मंत्र्यांचे आभार मानले आहेत.