* वारी हनुमान येथील घटना
संग्रामपूर : (एशिया मंच न्यूज )
वारी हनुमान येथील आड नदीतील राजण्या डोहात आज ११ जुलै रोजी एका युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत युवकाचे नाव अक्षय सिद्धार्थ भोजने (२३ वर्षे) असून तो इंदिरा नगर तेल्हारा येथील रहिवासी आहे.
सोनाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय भोजने हा आपल्या काही मित्रांसोबत वारी हनुमान येथे दर्शनासाठी गेला होता. दुपारी सुमारे २.३० वाजता मंदिरा जवळील राजण्या डोहाजवळ फिरत असताना त्याला पोहण्याचा मोह झाला. त्याने डोहाच्या उंच काठावरून पाण्यात उडी घेतली, मात्र उडी घेताना त्याच्या डोक्याला मार लागल्याने तो पाण्यातच बुडाला आणि पुन्हा वर न आल्याने मित्रांनी आरडाओरड केली.
घटनेनंतर वारी गावातील काही नागरिकांनी तात्काळ डोहात उतरून शोध घेतला असता, अक्षय पाण्यात मृतावस्थेत आढळून आला. नागरिकांनी त्याला बाहेर काढले. या प्रकरणी मृतकाचा भाऊ अनमोल भोजने याच्या फिर्यादीवरून सोनाळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (मर्ग) करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. शाकीर पटेल करत आहेत.
या दुःखद घटनेमुळे भोजने कुटुंबीय, नातेवाईक आणि इंदिरा नगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.