लोणार व शेगाव तालुक्यात ढगफुटीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून भरपाई द्या- रविकांत तुपकर* जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

लोणार व शेगाव तालुक्यात ढगफुटीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून भरपाई द्या- रविकांत तुपकर
*  जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी 
* 'क्रांतिकारी' च्या पदाधिकाऱ्यांनी केली नुकसानीची पाहणी
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
         जिल्ह्यातील लोणार व शेगाव या दोन तालुक्यांमध्ये पावसाने कहर केला आहे. या ढगफुटीमुळे शेतीचे आणि पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. घरांचेही नुकसान झाले आहे. सदर नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई विनाअट द्यावी, अशी मागणी युवा नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. या संदर्भात आज 22 जुलै रोजी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. तर दुसरीकडे क्रांतिकारीचे नेते सहदेव लाड व इतर पदाधिकाऱ्यांनी शेतावर जाऊन पाहणी केली व नुकसानग्रस्ताना धिर दिला.

         जिल्ह्यात एकीकडे अद्यापही जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे तर दुसरीकडे काही भागात मुसळधार पावसाने, ढगफुटीने थैमान घातले आहे. 21 जुलै च्या रात्री व 22 जुलै च्या सकाळी लोणार व शेगाव तालुक्यात ढगफुटी सदृष पाऊस झाला. नदी- नाले आपले पात्र सोडून वाहू लागले. या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणच्या शेतजमिनी खरडून गेल्या. काही शेतांमधील पिके वाहून गेली तर काही शेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अधिवृष्टीमुळे लोणार तालुक्यातील आरडव,वढव, हिरडव, गुंधा, गुंजखेड, चिंचोली सांगळे, पारडा दराडे, देऊळगाव कुंडपाळ, पांगरा डोळे, टिटवी, नांद्रा तसेच शेगाव तालुक्यातील नागझरी टाकळी, तिंत्रव, जवळा वरखेड, हिंगणा हुई यासह इतर गावांमध्ये शेतीचे आणि पिकांचे प्रचंड असे नुकसान झाले आहे,  त्यामुळे काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आहे तर काही ठिकाणी दुबार पेरणी देखील करण्यायोग्य जमीन राहिली नाही, त्यामुळे या दोन तालुक्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले आहेत. आधीच शेतकऱ्यांनी सावकाराकडून कर्ज काढून पेरणी केली होती, त्यात आता पुन्हा अतिवृष्टीचे संकट ओढवले आहे. यामुळे शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभे ठाकले आहेत. अशावेळी शेतकऱ्यांना तातडीने आधार देण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने तातडीने सर्व नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शंभर टक्के विनाअट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे केली आहे. दरम्यान क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सहदेव लाड व इतर कार्यकर्त्यांनी लोणार तालुक्यातील अतिवृष्टभागाची पाहणी करून रविकांत तुपकर यांच्याकडे आढावा मांडला.