स्वातंत्र्याच्या पंचाहत्तीनंतरही लिंगावासीयांना भाेगाव्या लागतात नरकयातना* आमचे जगणे मान्य नाही का : ग्रामस्थांचा संतप्त सवाल

स्वातंत्र्याच्या पंचाहत्तीनंतरही लिंगावासीयांना भाेगाव्या लागतात नरकयातना
* आमचे जगणे मान्य नाही का : ग्रामस्थांचा संतप्त सवाल
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        सरकारव्दारे ग्रामविकासातून राज्याचा विकास साधण्याच्या बाता हाकण्यात येत असल्या तरी प्रत्यक्षात मात्र, अनेक गावे स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतरही दुर्लक्षीतपणाचा कलंक भाळी मिळवत आहेत. यातील एक गाव असलेल्या लिंगा-काटे पांग्री येथील ग्रामस्थ अनेक वर्षांपासून दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या रस्ते, नाली, पाणी यासारख्या माफक मुलभूत सुविधांपासून अक्षरश: वंचित आहेत. केवळ नावापुरते असलेल्या इथल्या ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियाेजनामुळे या गावातील नागरिक नरकयातना भाेगत आहेत. त्यात शासन, प्रशासन आणि लाेकप्रतिनिधींचेही कमालीची अनास्था पाहता ‘आमचेही जगणे मान्य करा?’ , असा संतप्त सवाल येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
          सिंदखेड राजा तालुक्यातील लिंगा-काटे पांग्री या गट ग्रामपंचायतीतील लिंगा या साधारणत: ७०० लाेकसंख्येचे आडवळणी गाव. येथील बहुतांश नागरीकांचा उदरनिर्वाह शेतीवर अंवलंबून आहे. येथील ग्रामपंचायत केवळ शाेभेची वास्तू ठरल्याने गावात साधा पक्का रस्ता देखील उरलेला नाही. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. नाल्या नाहीत. याचा परिणाम येथील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर झाला आहे. गावात अनेक वर्षांनंतर पाणीपुरवठ्याची पाईप लाईन टाकण्यात आली आहे. मात्र, ही पाईप लाईनसाठी गावातील काॅंक्रीटचा मुख्या रस्ता पूर्णपणे खाेदून काढण्यात आला आहे. साेबतच गावातील नाल्या देखील नेस्तनाबूत झाल्या आहेत. दरम्यान पाईप लाईन टाकून माेठा कालावधी लाेटला असतानाही रस्त्याच्या कामाकडे पूर्णत: दूर्लक्ष झाले असल्याने संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे.
       गावातील सांडपाणी याच रस्त्यावरून वाहते. परिणामी जागाेजागी गटारे तुंबली आहेत. त्यामुळे मच्छर निर्माण होऊन रोगराई पसरण्याचा धोका आहे. विशेष म्हणजे ज्या पाईपलाईनसाठी गावातील रस्ता खाेदण्यात आली आहे, ती पाईपलाईन देखील केवळ दिखावा ठरला आहे. गावातील नागरिकांना आजही विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. या समस्यांबाबत ग्रामस्थांमधून ओरड होत असूनही ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजनामुळे या गावातील नागरिक नरकयातना भोगत आहेत.

        जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घ्यावी
गावातील चालण्यायाेग्य देखील राहिला नाही. गावात कुणी आजारी पडल्यास त्यांना दवाखान्यातही नेता येत नाही. विद्यार्थ्यांना दरराेज शाळेत ये-जा करण्यासाठी त्रास हाेताे. जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व बाबींची दखल घेवून गावातील मुलभूत सुविधांचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी येथील बाळकृष्ण चेके, सुनिल चेके, भानुदास पैठणे, पांडुरंग चेके, शंकर भालेराव, संजय गाढवे, उमेश भालेराव, ज्ञानेश्वर चेके, भारत चेके, अनंथा पैठणे, समाधान चेके, नवरत्न मानवतकर, लताबाई जाधव, सुरेश चेके, उध्दव चेके, संजय चेके, सचिन चेके, कैलास चेके, समाधान पैठणे, राधेश्याम शिंदे, पांडूरंग चेके, प्रदीप भालेराव, शिवानंद चेके, भारत चेके यांनी केली आहे.

* ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष : 
        गावातील समस्यांबाबत ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. गावातील समस्या साेडविण्यासाठी ज्यांना सरपंचपदावर बसविले आहे ते सरपंच गावात राहतच नाहीत. सरपंचाच वचक नाही तिथे ग्रामस्थांची काय भिस्त, अशी एकूण स्थिती पाहता ग्रामपंचायत सचिव देखील गावात फिरकत नसल्याचा आराेप ग्रामस्थांचा आहे.

* विद्येची वाट चिखलातून : 
          गावातील रस्त्याची समस्या अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. पूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. त्यात सध्या पावसाळा असल्याने गावातील सांडपाणी व पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. विशेष म्हणजे हा एकच रस्ता गावाला असल्याने चिखल तुडवत व घाण पाण्यातून नागरिकांना पायपीट करावी लागते. यामध्ये शाळकरी मुलांची मोठी गैरसोय होत आहे.