दरोड्यासह 8 बॅग लिफ्टींगच्या गुन्ह्यांची यशस्वी उकल
* एलसीबीची मोठी कारवाई : 12 लाख 19 हजारांचा मुद्देमाल जप्त
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे सरसावले असून त्यांच्या आदेशाने एलसीबीचे पोलिस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वात पथकाने दरोडा 1, बॅग लिप्टींग 8, दारूबंदी 2 व एका जुगार प्रकरणी तब्बल 12,19,150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 16 आरोपींवर कारवाई केली आहे. ही कारवाई 4 जुलै रोजी करण्यात आली.
बुलढाणा एलसीबीच्या पथकाने जिल्ह्यातील विविध ठिकाणी धडाकेबाज कारवाई केली आहे. मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत दरोडा प्रकरणी अयान अलियान खान रा.बाळापुर जि. अकोला याला ताब्यात घेण्यात आले. तसेच देऊळगाव राजा येथील बॅग लिफ्टिंग प्रकरणात गुन्ह्याची यशस्वी उकल करण्यात आली. यामध्ये 4 आरोपी निष्पन्न झाले. सुनील काळू चव्हाण, प्रीतम दशरथ चव्हाण, साईनाथ दशरथ चव्हाण, निलेश सुनील चव्हाण सर्व रा. वाटूर फाटा, परतूर जि. जालना अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी बॅग लिफ्टिंग च्या 8 गुन्ह्यांची कबुली दिली.
देऊळगाव राजा 1, मेहकर 2, साखरखेर्डा 1 व लोणार येथे 2 गुन्हे केल्याचे तपासात उघड झाले आहे. तसेच अमडापूर पोलीस स्टेशन हद्दीत देशी विदेशी दारूबंदीच्या कारवाईत आरोपी देवानंद जाधव रा. सारशिव याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या कडून मुद्देमाल जप्त करण्यात आला. बुलढाणा शहर पोलीस स्टेशन हद्दीत सोपान शेषराव धोरण रा. मोताळा या आरोपीकडून बोलेरो वाहनासह अवैध दारू असा एकुण 4,57,120 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.