महायुती सरकार असंवेदनशील : जयश्री शेळके * दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या निरापराध जीवांना श्रद्धांजली वाहण्याचा पडला विसर

महायुती सरकार असंवेदनशील : जयश्री शेळके 
* दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या निरापराध जीवांना श्रद्धांजली वाहण्याचा पडला विसर 
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
         संपूर्ण राज्यभरात आज महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला असतानाच, बुलढाणा येथील पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री मकरंद जाधव यांच्या उपस्थितीत शासकीय ध्वजवंदन कार्यक्रम पार पडला. दरम्यान, पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या निरापराध जीवांना श्रद्धांजली वाहण्याचा विसर त्यांना पडला असे सांगत, हा महायुती सरकारच्या असंवेदनशीलतेचा प्रत्यय असल्याची टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी केली.

      गुरुवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शहरातील पोलीस कवायत मैदानावर महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात पोलीस दलातील कर्तबगार अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तत्पूर्वी, राष्ट्रगीत झाले. उपस्थित सर्वांनी, मानवंदना दिली. यानंतर, पालकमंत्री मकरंद जाधव यांचे भाषण झाले. भाषणातून जिल्ह्यातील विविध विकास कामांवर त्यांनी प्रकाश टाकला. मात्र, पहेलगाम मध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेचा उल्लेख त्यांनी केला नाही, याशिवाय मृतकांना श्रद्धांजली वाहण्याचा विसर त्यांना पडला. पालकमंत्री हे महायुती सरकारचे घटक असून, यामुळे महायुती सरकारच्या असंवेदनशीलतेचा प्रत्यय मिळाला असल्याचा घणाघात जयश्री शेळके यांनी केला आहे.