बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
पाकिस्तान भारता विरोधात दहशतवादाच्या माध्यमातून करत असलेल्या वारंवारच्या कुरापती कायमच्या मोडून काढण्याची वेळ आली आहे. त्याचा बिमोड झालाच पाहिजे, अशा भावना आनंदी परिवार व निसर्ग परिवार तसेच रामनगर च्या नागरिकांच्या वतीने आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केल्या.
२२ एप्रिलला काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला करून 26 निरपराध पर्यटकांचा बळी घेतला. या कृत्याचा निषेध करण्यासाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या शाहीनाताई पठाण होत्या. प्रसिद्ध गझलकार डॉ. गणेश गायकवाड, कर्नल, सुहास जतकर, डॉ. डी. एम. कानडजे, प्राचार्य अण्णासाहेब म्हळसणे, पत्रकार अरुण जैन, राजेंद्र काळे, वैशालीताई रणजितसिंग राजपूत, काश्मीरातील दहशतवादी हल्ल्याच्यावेळी तेथे उपस्थित असलेले पारस जैन अनुभव कथनासाठी उपस्थित होते. सर्व बाजूंनी पाकिस्तानची नाकाबंदी झाली पाहिजे, अशी भावना डॉ. गणेश गायकवाड यांनी व्यक्त केली. शाहीना ताई पठाण यांनी आतंकवादामागील शक्तींचा नाश केला पाहिजे, अशा भावना व्यक्त केल्या. कर्नल सुहास जतकर यांनी युद्धातील प्रसंग व या घटनेचे गांभीर्य तसेच आंतरराष्ट्रीय परिणाम या विषयावर भाष्य केले. पत्रकार अरुण जैन, वैशालीताई राजपूत, राजेंद्र काळे यांनीही यावेळी श्रद्धांजलीपर भावना व्यक्त केल्या.
* २६ जणांचे प्राण गमावल्याचे दु:ख मोठे ; पारस जैन
पारस जैन यांनी यावेळी काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतरची परिस्थिती, वातावरण, काश्मिरी नागरिकांची माणुसकी याबाबत माहिती दिली. तो म्हणाला आमचा जीव वाचला याच्या आनंदापेक्षा २६ निष्पाप नागरिकांचे जीव गेले याचे दुःख, हळहळ मोठी होती. धास्तीमुळे दोन रात्री जीव मुठीत धरून अक्षरशः जागून काढल्याचे त्यांनी सांगितले.