बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
राज्यातील शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुलडाणा जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने २ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चातत जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षाच्या प्रवक्त्या ॲड.जयश्री शेळके यांनी केले आहे.
राज्यकर्त्यांच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे आज जगाचा पोशिंद्यावरच उपाशी राहण्याची वेळ आली आहे. 2023-24 या सलग दोन वर्षांत नैसर्गिक आपत्ती आणि बाजारभावातील घसरण यामुळे राज्यातील सुमारे ६८% शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाने जाहीर केलेल्या पीक विमा योजनांचे हजारो कोटींच्या थकबाकीचे वाटप अद्याप रखडले आहे. राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला असला तरीही सरकार मात्र अद्यापही निद्रावस्थेतच आहे. निर्दयी व खोटारड्या सरकारला भानावर आणण्यासाठी या ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. हा लढा केवळ शेतकऱ्यांचा नाही, तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या भविष्यासाठी आहे. त्यामुळे सर्व पक्ष, गट-तट, मतभेद बाजूला सारुन केवळ शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी या मोर्चात सहभागी व्हावे.
* शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे : सर्व शेतकऱ्यांची १००% कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्यात यावा. ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. सोयाबीन, कापूस, मका, तूर व इतर पिकांना उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळाला पाहिजे. सन २०२३ व २०२४ च्या शेतकरी पीक विम्याचे थकीत पैसे तात्काळ देण्यात यावे. तुषार सिंचन व ठिबक सिंचनाचे रखडलेले अनुदान देण्यात यावे. शेतमालावर आधारित उद्योग धंदे उभारण्यात यावेत. वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेतीला तार कुंपण बसवून देण्यात यावे. शेतकऱ्यांच्या शेतीचे संपूर्ण वीजबिल माफ करून शेतीसाठी लागणारी वीज मोफत उपलब्ध करून द्यावी. नाफेड खरेदी बंद झाल्यामुळे खुल्या बाजारात विकाव्या लागणाऱ्या सोयाबीनला प्रति क्विंटल रु. २ हजार इतका भावफरक देण्यात यावा. या मागण्यांकरिता लढा देण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याने या ऐतिहासिक मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन ॲड.जयश्री शेळके यांनी केले आहे.