केस व नख गळतीच्या आजारावर नियंत्रणासाठी केंद्रीय पथकाला निर्देश : केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव* केस व नख गळती आजाराच्या संशोधनासाठी केंद्रीय पथक दाखल

केस व नख गळतीच्या आजारावर नियंत्रणासाठी केंद्रीय पथकाला निर्देश :  केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव
* केस व नख गळती आजाराच्या संशोधनासाठी केंद्रीय पथक दाखल

बुलढाणा  : (एशिया मंच न्युज)
          जिल्ह्यातील काही गावांमध्ये केस गळतीचे आणि त्यानंतर नख गळतीचे प्रकार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज 22 एप्रिल रोजी केंद्र सरकारच्या पथकाला या आजाराच्या मुळाशी जाऊन कार्य करण्याचे निर्देश दिले.

      केस व नख गळतीच्या पश्वभूमीवर मेहकर येथे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आयसीएमआर, राष्ट्रीय रोग नियंत्रण विभाग, जल जीवन मिशन अंतर्गत पाणी गुणवत्ता विभाग, लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज नवी दिल्लीचे डरमेटोलॉजी तज्ज्ञ, FSSAI, भारतीय गहू व जव संशोधन केंद्र हरियाणा, प्लांट क्वारंटाईन विभाग आणि कृषी मंत्रालयाचे तज्ज्ञ तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते आदी उपस्थित होते.
          केंद्रीय मंत्री जाधव यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत रुग्णांना पुन्हा त्रास होऊ नये, यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक औषधोपचार सुरू करण्याचे निर्देश दिले. तसेच या आजाराचे मूळ कारण शोधून त्यावर प्रभावी उपाययोजना करा. यासाठी पाणी, रक्ताचे नमुने तसेच बाधित गावातील माती, धान्य आदींचे नमुने संकलित करून प्रयोगशाळेत तपासणी करून अहवाल सादर करण्याचे सुचना दिल्या. 

        बुलडाणा जिल्ह्यातील पहुरजिरा, कालवड, कठोरा, भोनगाव, बोंडगाव, शेगाव आणि नांदुरा तालुक्यातील एकूण तेरा गावांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. या प्रकरणाची केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या निर्देशानुसार केंद्र आणि राज्य सरकारच्या नऊ विभागांचे तज्ज्ञ आज जिल्ह्यात दाखल झाले आहेत. तज्ज्ञांकडून आता गावागावात जाऊन रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत प्रत्यक्ष माहिती संकलन केले जाईल. यावरूनच या आजाराचा खरा स्रोत आणि त्यावरील उपाय निश्चित केले जातील.