हॉटेल मालकाने रोखल्याने बचावले बुलढाण्यातील जैन कुटूंबिय !

हॉटेल मालकाने रोखल्याने बचावले बुलढाण्यातील जैन कुटूंबिय !
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
       जम्मू कश्मिरमध्ये पर्यटनासाठी गेलेले बुलढाणा येथील पत्रकार अरूण जैन यांचे कुटूंबिय पहलगाम अतिरेकी हल्ल्याच्यावेळी पहलगाम येथील हॉटेलमध्ये मुक्कामी होते. दरम्यान पर्यटनासाठी हॉटेलबाहेर निघण्याची तयारी करीत असलेल्या जैन कुटूंबियांना हॉटेल मालकाने रोखल्याने जैन कुटूंबियांतील पाच जण थोडक्यात बचावले.

         पहलगाम हल्ल्यात एकूण 26 पर्यटकांचा बळी गेला असून, यात महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. शहरातील ज्येष्ठ पत्रकार अरुण जैन यांचे बंधू नीलेश जैन, त्यांची पत्नी व 3 मुले असे एकूण 5 जण 18 एप्रिल रोजी पर्यटनासाठी जम्मू काश्मीरला गेले होते. अतिरेक्यांनी हल्ला केला. तेव्हा हे कुटुंब तेथीलच एका हॉटेलमध्ये थांबले होते. ते मंगळवारी दुपारी पर्यटसाठी हॉटेलबाहेर पडणार होते. पण हॉटेल मालकाने त्यांना रोखले. बाहेर गोळीबार सुरू झाला असून, तुम्ही बाहेर पडू नका, अशी सूचना त्यांना केली. त्यामुळे जैन कुटुंबाने बाहेर पडणे टाळले. त्यामुळे ते थोडक्यात बचावले. यामध्ये पारस अरुण जैन, ऋषभ अरुण जैन, श्वेता निलेश जैन, अनुष्का निलेश जैन यांचा समावेश आहे.

 * काश्मीर फिरण्याचा उत्साह मावळला : 
           नीलेश जैन यांनी याविषयी बोलताना सांगितले की, मंगळवारी दुपारी आम्ही पहलगाम पाहण्यास निघणार होतो. तेवढ्यात हॉटेल मालकाने आणि कर्मचाऱ्यांनी आम्हाला हॉटेल बाहेर पडण्यास मनाई केली. बाहेर गोळीबार सुरू झाल्याची कल्पना दिली. आता आमचा काश्मीर फिरण्याचा उत्साह मावळला आहे. आमची शासनाला विनंती आहे की, आमची येथून बाहेर पडण्याची व्यवस्था करावी. आम्ही स्थानिक वाहनाने श्रीनगरला पोहोचत आहोत, असे त्यांनी सांगितले.