बुलढाण्यात विधवा, घटस्फोटीत महिलांचा पुनर्विवाह सोहळा* दहा जोडप्यांच्या जुळल्या रेशीमगाठी,मानस फाउंडेशनच्या कार्याला लोक चळवळीचे स्वरूप* बुलढाण्याच्या भूमीने नेहमीच वेगळा विचार दिला : डॉक्टर राजेंद्र शिंगणे

बुलढाण्यात विधवा, घटस्फोटीत महिलांचा पुनर्विवाह सोहळा
* दहा जोडप्यांच्या जुळल्या रेशीमगाठी,मानस फाउंडेशनच्या कार्याला लोक चळवळीचे स्वरूप
* बुलढाण्याच्या भूमीने नेहमीच वेगळा विचार दिला :  डॉक्टर राजेंद्र शिंगणे
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
        बुलढाण्याची भूमी ही वेगळा विचार देणारी भूमी आहे. महात्मा ज्योतिबा फुले ,ताराबाई शिंदे यांच्या विचारांना अभिप्रेत आजचा विधवा विवाह सोहळा हा देखील वेगळा विचार देणारा असून आगामी काळात ही एक लोक चळवळ झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी आज 12 एप्रिल रोजी केले. तर विधवा घटस्फोटीत महिलांना त्यांचे हक्क देण्याबरोबर त्यांचे संसार फुलणे ही काळाची गरज असल्याचे प्रा. डी.एस. लहाने म्हणाले.
        बुलढाणा येथील सैनिक मंगल कार्यालयात आज विधवा महिलांचा पुनर्विवाह सोहळा थाटात पार पडला. यावेळी आमदार धीरज लिंगाडे , माजी आमदार विजयराज शिंदे, उबाठाच्या नेत्या जयश्रीताई शेळके, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत , अन्न व औषध प्रशासन आयुक्त गजानन घीरके, समाज कल्याण अधिकारी अमोल दिघोळे आदींची उपस्थिती लाभली. उघड्या जीप वर वधू-वरांची निघालेली वरात, त्यापुढे नाचणारे बुलढाणेकर, वर बापाच्या भूमिकेत वावरणारे प्रा. डी.एस. लहाने, मानस फाउंडेशन चे पत्रकार गणेश निकम ,शाहीनाताई पठाण, प्रज्ञाताई लांजेवार, पत्रकार संदीप वानखेडे, प्रतिभा भुतेकर ,प्रा. ज्योती पाटील, अनिता कापरे ,मनीषा वारे , सुरेखा सावळे, स्वाती सावजी, एडवोकेट संदीप जाधव, गजानन मुळे , रवी लहाने, मीनाताई लहाने, किरण पाटील, गौरव देशमुख आणि सर्वच सदस्य यांनी घेतलेली मेहनत फळाला आली. सर्व स्तरातून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता विधवा विवाह सोहळा सामाजिक बदलाची नांदी ठरला.

     सत्यशोधक पद्धतीने पार पडलेल्या या सोहळ्यामध्ये दहा जोडपी विवाहबद्ध झाली. पुनर्विवाह करणाऱ्या जोडप्यांची मोठ्या थाटामाटात आणि वाजत गाजत शहरातून मिरवणूक काढण्यात आली. अगदी पहिल्या विवाहाप्रमाणे सर्व सोपस्कार पार पाडण्यात आले. विवाहबद्ध झालेल्या दहा जोडप्यांना संसार उपयोगी साहित्य आणि 5 लाख रुपयांचे विमा कवच देखील देण्यात आले. यावेळी विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. विधवा, घटस्फोटीत, परिततक्ता अशा एकल महिलांना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी, त्यांचा पुनर्विवाह व्हावा, या महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांना विविध शासकीय योजनेचा लाभ मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून बुलढाण्यातील प्रा. दत्तात्रय लहाने यांच्या संकल्पनेतून मानस फाउंडेशनच्या माध्यमातून चळवळ राबवली जात आहे. मानस फाउंडेशन माध्यमातून आजपर्यंत 90 पेक्षा अधिक विधवा महिलांचे पुनर्विवाह लावले गेले आहेत, तर शंभर पेक्षा अधिक एकल महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. मानस फाउंडेशनने एकल महिलांच्या बाबतीत सुरू केलेली ही चळवळ आता लोक चळवळ होताना दिसत आहे. 

* महापुरुषांचे थांबलेलं काम प्राध्यापक लहाने यांनी सुरू केले - जयश्री शेळके
 
        महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी विधवा महिलांसाठी काम केले ही चळवळ दरम्यानच्या काळात थंडावली होती मात्र हेच काम आता प्राध्यापक डी. एस. लहाने यांनी हाती घेत जोमाने पुढे नेले आहे. शिकल्या सवरल्या मुलांची विवाह देखील आता जुळत नाही. विवाह संस्था अशा वळणावर येऊन ठेपली आहे. अशावेळी विधवांचे विवाह जुळून आणणे हे मोठे अवघड काम प्रा. लहाने यांनी अशक्य ते शक्य करून दाखविले आहे. इतिहास याची नोंद घेतले. शिवाय राहणार नाही, असे जयश्रीताई शेळके यावेळी बोलताना म्हणाल्या.