पत्रकारांच्या लेखणीमुळेच विकासाला बळ ! दिनेश गीते यांचे प्रतिपादन* व्हॉईस ऑफ मीडिया सर्वव्यापी संघटना : विश्वंभर वाघमारे* पत्रकारदिनानिमित्त सत्कारमूर्तींचा गौरव

पत्रकारांच्या लेखणीमुळेच विकासाला बळ ! दिनेश गीते यांचे प्रतिपादन
* व्हॉईस ऑफ मीडिया सर्वव्यापी संघटना : विश्वंभर वाघमारे
* पत्रकारदिनानिमित्त सत्कारमूर्तींचा गौरव
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
       पत्रकार समाजासाठी झटणारा नि:स्वार्थी कार्यकर्ता असतो. आजच्या स्वार्थी युगात हा गुण दुर्मीळ झाला असला तरी पत्रकार मात्र नि:स्वार्थपणे समाजाची सेवा करतात. वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करणारे पत्रकार मात्र अनेक सेवा, सुविधांपासून वंचित राहतात. देशव्यापी असलेली व्हॉईस ऑफ मीडिया ही संघटना पत्रकारांच्या कल्याणासाठी राबवत असलेले उपक्रम स्तुत्य आहेत. पत्रकारांच्या लेखणीमुळेच विकासाला बळ मिळते, असे प्रतिपादन सेवानिवृत्त निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी गुरुवारी केले.

      व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने पत्रकारभवन येथे सेवानिष्ठेचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के होते. तर ज्येष्ठ पत्रकार विश्वंभर वाघमारे, निवृत्त उपजिल्हाधिकारी रमेश घेवंदे, ज्येष्ठ पत्रकार चंद्रभूषण मुंगे हे सत्कारमूर्ती म्हणून विचारपीठावर विराजमान होते. त्याचप्रमाणे कोअर कमिटी सदस्य अरुण जैन, विदर्भ संघटक सिद्धार्थ आराख, जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे यांची उपस्थिती होती.

        यावेळी विश्वंभर वाघमारे यांनी व्हॉईस ऑफ मीडिया ही सर्वव्यापी संघटना असल्याचे सांगत संघटनेच्या सत्कार्याला शुभेच्छा दिल्या. सेवानिवृत्त झालेला माणूस प्रशासनाच्या पडद्याआड जातो; परंतु व्हॉईस ऑफ मीडियाने आमची दखल घेत आमचा सत्कार घडवून आणला, त्याबद्दल आम्ही ऋणी आहोत, अशी कृतज्ञता रमेश घेवंदे यांनी व्यक्त केली.
      अध्यक्षीय भाषणात प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के म्हणाले, राज्यात पत्रकारांच्या आधीच १२९ संघटना असताना १३० व्या संघटनेची गरज पडली. कारण, पत्रकारांच्या मूळ समस्या 'जैसे थे' आहेत. पंचसूत्रीच्या आधारावर राष्ट्रीय नेतृत्व असलेल्या संदीप काळे यांच्या मार्गदर्शनात पत्रकारांच्या समस्या सोडविण्याचे काम व्हॉईस ऑफ मीडिया करीत आहे. महाराष्ट्राच्या मातीतून उभे राहिलेले हे संघटन देशपातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पाऊल ठेवत आहे. पद हे मिरवण्यासाठी नव्हे तर काम करण्यासाठी आहे आणि त्यावरच आपले मार्गक्रमण सुरू राहील, अशी ग्वाही अनिल म्हस्के यांनी यावेळी दिली.

       प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस गजानन धांडे, सूत्रसंचालन अभिषेक वरपे यांनी तर आभार प्रदर्शन शहराध्यक्ष गणेश निकम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप वंत्रोले, शौकत शाह , रमेश उगले, आदेश कांडेलकर, राहुल रिंढे, अक्षय थिगळे, ओम सोळंकी यांनी परिश्रम घेतले.

गौरवाचे मानकरी
प्रशासकीय सेवेत असताना समाजाभिमुख प्रशासन राबविणाऱ्या सेवानिवृत्त निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश घेवंदे यांच्यासह पत्रकारितेतील योगदानासाठी ज्येष्ठ पत्रकार विश्वंभर वाघमारे व चंद्रभूषण मुंगे यांचा यावेळी गौरव करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार राजेश डिडोळकर यांची कन्या सिद्धी डिडोळकर हिचा क्रीडा क्षेत्रातील भरीव कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच पत्रकार प्रेमकुमार राठोड यांचे चिरंजीव वैभव याची भारतीय स्टेट बॅंकेमध्ये निवड झाल्याबद्दल आणि लक्ष्मीकांत बगाडे यांचा सुपुत्र ऋषिकेशची टीसीएसमध्ये निवड झाल्याबद्दल व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने सन्मान करण्यात आला.