* आई-वडिलांचे छत्र हरवल्याने झाले आहेत पोरके
मोताळा : (एशिया मंच वृत्त)
राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष तथा वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीपदादा शेळके यांनी तालुक्यातील रिधोरा खंडोपंत येथील आई- वडिलांचे छत्र हरवलेल्या भावंडांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच तिघांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले.
रिधोरा येथील संदीप मानकर हे मजुरी करुन प्रपंच चालवत होते. एक वर्षापूर्वी आजारात त्यांच्या पत्नीचे निधन झाले. तर गत महिन्यात त्यांचा सुद्धा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि एक मुलगा आहे. काळाने आई-वडील हिरावल्याने ही भावंडं पोरकी झाली आहेत. मोठी मुलगी स्नेहल संदीप मानकर ही नववीत आहे. तर अपूर्वा ही सहावीत आणि लहानगा समर्थ चौथीत शिकत आहे. खरं तर तिघांचेही वय खेळण्या बागडण्याचे आहे. मात्र त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.
राजर्षी शाहू परिवार नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर राहिला आहे. आई -वडीलांचे छत्र हरवलेल्या भावंडांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहून त्यांची सर्व शैक्षणिक जबाबदारी स्वीकारत असल्याचे संदीपदादा शेळके यांनी जाहीर केले. यावेळी मुलांचे नातेवाईक तथा ग्रामस्थ उपस्थित होते.