*नातेवाईकांचा आक्रोश, काही काळ तणाव
* पोलिसांनी सांभाळला मोर्चा
* आ.संजय गायकवाड यांच्या माध्यस्तीने निवळला वाद
बुलढाणा : (एशिया मंच वृत्त)
शहरातील जोहर नगर भागात राहणाऱ्या शेख आसिफ या तरुणाची शहरातील सोळंके -ले आऊट मधील माळी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यासाठी 3 डिसेंबर 2023 रोजी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरने ऑपरेशनची तयारी करून बेशुद्ध करण्यासाठी अनेसथेसियाचा इंजेक्शन दिल्यानंतर शेख आसिफ बराच वेळ झाल्यानंतरही शुद्धीत आला नाही. दरम्यान त्याची प्रकृती खालावली म्हणून पुढील उपचारासाठी लद्धड हॉस्पिटल येथे 4 डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना शेख आसिफ याचा दुपारच्या दरम्यान मृत्यू झाला. ही माहिती आसिफचे नातेवाईक व मित्रांना मिळताच त्यांनी माळी रुग्णालयाकडे धाव घेतली व काहींनी गोंधळ घातला.
याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांचा ताफा रुग्णालया परिसरात दाखल झाला. तसेच काही वेळानंतर आमदार संजय गायकवाड रुग्णालयात पोहोचले व त्यांनी संबंधित डॉक्टर व मृतकाच्या नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर तणाव निवळला.
शेख आसिफ हा घरातील कर्ता पुरुष होता. या घटनेमुळे त्याचा परिवार उघड्यावर आला असून त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे. शेख आसिफ हा घर परिवार चालविण्यासाठी छोटा-मोठा व्यवसाय हात गाडीवर करून त्याचा संसार चलवीत होता. या घटनेमुळे त्याच्या परिवारावर डोंगर कोसळला आहे. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे हे अद्याप स्पष्ट झाले नाही, तरी याची चौकशी करून त्या गरीब कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी सामान्य नागरिकात होताना दिसत आहे.