येत्या ३ जानेवारीला चिखली येथे विधवा, परित्यक्ता यांचा परिचय व समुपदेशन मेळावा !* डी.एस.लहानेंचा पुढाकार

येत्या ३ जानेवारीला चिखली येथे  विधवा, परित्यक्ता यांचा परिचय व समुपदेशन मेळावा !
* डी.एस.लहानेंचा पुढाकार
चिखली : (एशिया मंच वृत्त)
         विधवा, परित्यक्ता महिलांचे पुनर्वसन आणि पुनर्विवाह यासाठी प्रयत्न केले तर समाजातील अनेक महिलांचे जगणे सोपे होणार आहे. मात्र, सामाजिक धारणेमुळे त्या लग्न करत नाहीत. तर काही समाजामध्ये तशी मान्यताही नसते. अलीकडे नोकरी, रोजगार, व्यवसाय, नसल्याने अनेक विवाहयोग्य तरुणांना मुली मिळत नाही. नेमकी ही बाब हेरून प्रा.डी.एस.लहाने यांनी पुरोगामित्वाचे पाऊल उचलत चिखलीत विधवा, परित्यक्ता परिचय व समुपदेशन मेळाव्याची अभिनव संकल्पना मांडली आहे.
स्थानिक श्रीराम नागरी पतसंस्थेच्या सभागृहात १९ डिसेंबर रोजी पार पडलेल्या बैठकीत प्रा.लहानेंनी ही माहिती दिली. यावेळी श्रीराम नागरीचे अध्यक्ष पंडितराव देशमुख, सी अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शे.अनिस, डॉ.सत्येंद्र भुसारी, रामेश्वर पाटील, बाळासाहेब ठाकरे, कमलकिशोर लांडगे, दिपक म्हस्के, आशीष लढ्ढा, प्रा.शाहीना पठाण, प्रतिभा भुतेकर, सोनुने, बाळु पवार, मनोज दर्डा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रा.लहानेंनी यापूर्वी बुलढाण्यात सामाजिक बदल घडवणारे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. त्यापश्चात आता चिखलीत येत्या ३ जानेवारीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीला हा उपक्रम राबविण्याचा विचार या बैठकीत मांडला असता उपस्थित चिखलीकरांनी यास सर्वतोपरी सहकार्याचा समाजाधार दिला. प्रामुख्याने अनेक महिलांना कोणतीही चूक नसताना वैवाहिक आयुष्याच्या सुरूवातीलाच किंवा मध्यावर पतीच्या अकाली निधनाने उर्वरित आयुष्यात विधवेचे जीवन जगावे लागते. काही महिला घटस्फोटीत तर काही परित्यक्ता. अशा महिलांना समाजात वावरताना व एकाकी जीवन जगताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. यातून त्यांना दिलासा मिळावा यासाठी प्रा.लहानेंही पुढाकार घेतला आहे. पतीच्या निधनानंतर कमी वयातील महिला आयुष्यभर आपले जीवन विना जोडीदार राहतात. काही समाजात दूसरे लग्न मान्य नसते. त्यामुळे त्या पुढचे पाऊल टाकण्याची हिंमत करत नाही. तर समाजदेखील जे पूवीर्पासून सुरू आहे. त्याची री ओढत असतो. आज महिला कोणत्याच क्षेत्रामध्ये मागे नाही, सर्वच क्षेत्र महिलांनी काबीज करून आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. मात्र जोडीदार शोधणं तिला आजही शक्य नाही. त्यामुळे एकल जीवन तिच्या नशिबी येते.         Jदुसरीकडे समाजात सध्या मुलींची संख्या कमी झाली आहे. अनेक समाजात मुलीच मिळत नाहीत. अनेक समाजात कोणतीही मुलगी चालेल अशी स्थिती आली आहे. या मुलांनी एखाद्या विधवेसोबत संसार थाटला तर त्यात गैर काहीच नाही. यासाठी समुपदेशन व पुढाकाराची गरज असल्याने प्रा.डी.एस.लहाने यांनी याबाबत पुढाकार घेतला असून सामाजिक जनजागृतीचे काम सध्या ते करीत आहेत. यानुषंगाने चिखली शहरात ३ जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व महिला मुक्तीदिनी पुरोगामित्वाची प्रचिती देणारा हा परिचय मेळावा पार पडणार आहे. 

"तरुणांना मिळणार जोडीदार :
       तालुक्यात तरुण वयात वैधव्य आलेल्या महिलांसह तरूणांचीही संख्या मोठी आहे. तर प्रयत्न करूनही लग्नासासठी मुलगी न मिळणाºयांचीही संख्या मोठी आहे. त्यानुषंगाने मेळाव्यातून समुपदेशन होण्यासह अनेकांना जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. 
* युवकांना आवाहन :
        महात्मा ज्योतीराव फुलेंनी आपला दत्तक पुत्र यशवंत याचे लग्न विधवेसोबत लावून देत आदर्श घालून दिला आहे. हा कित्ता पुढे नेण्याची आवश्यकता आहे. त्यानुषंगाने विवाहयोग्य तरुण, इच्छुक पालकांनी व विवाह इच्छुकांनी संपर्क करण्याचे आवाहन आयोजक डी.एस.लहाने यांनी केले आहे.