* जळगाव जामोद नगर परिषद येथील प्रकार
जळगाव जामोद : (एशिया मंच वृत्त)
विद्युत ठेकेदार यांचे कामाचे बिल काढण्यासाठी पैशाची मागणी करत असल्याचे ठेकेदार यांनी अशी तक्रार अँटी करप्शन ब्युरो अमरावती यांच्याकडे केली होती, या तक्रारीवरून अँटी करप्शन ब्युरो ने आज 13 डिसेंबर 2023 रोजी नगर परिषद जळगाव जामोद येथे सापळा रचून नगर परिषदेचे मुख्याधिकारी, विद्युत पर्यवेक्षक 12 हजार रुपयांची लाच घेताना या दोघांना आज एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार शहरातील पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाचे बिल अदा केल्याचा मोबदला म्हणून संबंधित ठेकेदाराकडून मुख्याधिकारी आणि विद्युत पर्यवेक्षक या दोघांनीही लाच मागितली होती. लाच देण्याचा नेहमी तगादा लावल्याने यामुळे त्रस्त झालेल्या ठेकेदाराने तशी तक्रार अँटी करप्शन ब्युरो कडे केली होती. सदर तक्रारची तपासणी केल्यानंतर अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास सापळा रचून जळगाव जामोदचे 32 वर्षीय मुख्याधिकारी आकाश डोईफोडे, नगर परिषदेचे विद्युत पर्यवेक्षक दीपक शेळके (30 वर्ष ) या दोघांना तक्रारदाराकडून 12 हजार रुपयांची लाच घेताना नगर परिषदेतच रंगेहात पकडले. आरोपी मुख्याधिकारी आणि विद्युत पर्यवेक्षक हे दोन्ही तरुण असून आकाश डोईफोडे हा अहमदनगर जिल्ह्यातील तर दीपक शेळके हा मोताळा तालुक्यातील उबाळखेडचा मूळ रहिवासी आहे.
मारुती जगताप पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, देविदास घेवारे अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र यांचे मार्गदर्शनात ही धाडसी कारवाई पो.उपअधिक्षक श्रीमती शितल घोगरे, पो. नि. सचिन इंगळे, महेश भोसले सापळा पथक स.फौ. शाम भांगे, पोहेकॉ. विलास साखरे, प्रवीण बैरागी, रवी दळवी, पो. ना. जगदीश पवार, विनोद लोखंडे, पोकाॅ शैलेश सोनवणे, म.पो.कॉ. स्वाती वाणी आणि चालक पो.ना. नितीन शेटे, पोकाॅ अरशद शेख लाप्रवि बुलढाणा यांच्या पथकाने केली आहे.