* मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे यांच्या संकल्पनेतून राबविणार अभियान
चिखली : (एशिया मंच वृत्त)
गत काही वर्षापासून सुरु असलेले चिखली शहराचे विद्रुपीकरण थांबावे यासाठी अनेक प्रयत्न झाले. परंतू शहरातील बेशिस्त प्रवृत्तींना लगाम घालण्यात अपयश आले असता आता नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे यांनी पूढाकार घेत शहराच्या सौंदर्यीकरणात भर टाकणारे पाऊल उचलत मुख्य मार्गावरील भग्नावस्थेत असलेल्या दुभाजकावर वृक्षारोपण करुन शहरातील रस्त्याची शोभा वाढविण्यासाठी पूढाकार घेतला आहे. यासाठी शहरातील नागरीकांनी सहकार्य करावे असे भावनिक आवाहन देखिल त्यांनी वृक्ष लागवडी प्रसंगी केले.
याप्रसंगी त्यांनी वृक्षांची काळजी घेण्यासाठी विशेष मोहिम राबवणिार असल्याचे सांगत ज्या ठिकाणी वृक्ष लागवड झाली त्या परिसरातील व्यापारी तथा नागरीक यांच्यावर या वृक्षाच्या देखभालीसाठी त्यांनी साद घातली असून त्याला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा देखिल त्यांनी बोलून दाखविली. शहरातील पत्रकार, व्यापारी तथा प्रतिष्ठीत नागरीक यांच्याहस्ते 20 नोव्हेंबर 2023 रोजी या वृक्षाची लागवड करण्यात आली.
.या दुभाजकावर होणारी घाण आणि त्यामुळे पूर्वी असलेले वृक्ष हे रुक्ष झाले होते. त्यामुळे नविन लागवड केलेल्या या झाडांची निगा राखून त्यांना वैभव प्राप्त करुन देण्याची जबाबदारी शहरातील प्रत्येकाची असून शहरात होणारी घाण कमी करण्यासाठी चिखलीकरांनी देखिल पूढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
यावेळी मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे यांनी स्वत: जातीने लक्ष घालून शहरातील व्यापारी विलास भालेकर, डॉ.समदाणी, प्रशांत बाहेती, चुनावाले, संजय ढोले, उबाळेभाऊ, अजय कोठारी, भाजपाचे शहराध्यक्ष पंडीतदादा देशमुख, पत्रकार कैलास गाडेकर, रवी फोलाने, छोटू कांबळे, भारत जोगदंड, शे.मुख्तारभाई, रंगनाथ सावळे, दिनेश देशमुख, बस स्थानकावरील अॅटो चालक, मनसेचे प्रवीण देशमुख, दिपक भूतेकर यांच्यासह सुज्ञ नागरीक यांच्याहस्ते दुभाजकावर ठिकठिकाणी झाडे लावली. तसेच सहकार्य म्हणून न.प.चे कर्मचारी कुळकर्णी, तसेच सामाजिक कार्यकर्ते सुभाष मोरे यांनी सहकार्य केले.
* मुख्याधिकार्यांचे आवाहन...
चिखली शहराच्या सौंदर्यीकरणासाठी शहराच्या मधोमध तसेच मोकळ्या जागेत, रस्त्याच्या बाजूने न.पा.च्यावतीने वृक्षारोपण करण्यात येत असून नागरीकांनी आपल्या दुकानासमोरील झाड हे आपले झाड... आपली जबाबदारी समजून त्याची निगा राखावी. तसेच रस्ता दुभाजकावर कोणीही कचरा टाकू नये. कचरा हा घंडागाडीतच टाकावा असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ.अजय कुरवाडे यांनी केले.
* पतसंस्थांनी घ्यावी जबाबदारी...
चिखली शहर अधिकाधिक हरीत व्हावे यासाठी शहरातील पतसंस्थांनी चिखली न.पा.च्या वतीने लावण्यात आलेल्या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी घ्यावी. त्याचप्रमाणे झाडांना ट्रीगार्ड लावल्यास झाडे जगतील. आणि शहरातील पतसंस्थांचा हरीत शहर सुंदर शहर होण्यास हातभार लागेल असेही मत मुख्याधिकारी डॉ.कुरवाडे यांनी व्यक्त केले.
