७ दिवसात मागण्या मान्य करा अन्यथा २९ नोव्हेंबरला मंत्रालयाचा ताबा घेऊ – रविकांत तुपकर
* तुपकरांच्या नेतृत्वात बुलढाण्यात निघाला सोयाबीन – कापूस उत्पादकांचा रेकॉर्डब्रेक महामोर्चा
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
राज्यभरातील हजारो शेतकरी मुंबईच्या दिशेने आगेकूच करतील व २९ नोहेंबरला मंत्रालयात घुसून मंत्रायालाचा ताबा घेतील, असा गंभीर इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
किन्होळा येथे मुक्कामी असलेली रविकांत तुकारांची रथयात्रा पहाटे बुलढाणा कडे मार्गस्थ झाली, दुपारी 12 वाजता यात्रा बुलढाण्यात पोहोचताच यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. या सोबतच पहाटेपासून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकऱ्यांनी खचाखच भरलेली वाहने बुलढाण्यात दाखल होत होती. दुपारी 1 वाजता जिजामाता व्यापारी क्रीडा संकुल परिसरातून रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात या महामोर्चाला सुरुवात झाली. संगम चौक, जयस्तंभ चौक, मुख्य बाजार लाईन, कारंजा चौक यामार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. त्यानंतर या मोर्चाचे रूपांतर विराट सभेत झाले. शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करून व स्व. राणा चंदन यांना अभिवादन करून या सभेची सुरुवात झाली. राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी तसेच कर्नाटक राज्यातून आलेले पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना तुपकर यांनी सांगितले की, आपण ज्यांना खासदार आमदार म्हणून निवडून देतो त्यांनी सभागृहात सोयाबीन कापसाचा प्रश्न मांडला पाहिजे परंतु दुर्दैवाने सोयाबीन कापसावर कुणीच बोलत नसल्याने सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्यामुळे आता आपल्या हक्काची लढाई आपल्यालाच लढावी लागणार आहे.
नाही, संपत्ती नाही असे काही जण म्हणतात परंतु मोर्चात विराट संख्येने उपस्थित असलेले हे शेतकरी, शेतमजूर आपली खरी संपत्ती असून त्यांच्या बळावरच आपण ही लढाई लढणार आहे. गेल्या वर्षी सरकारने सोयाबीन-कापसाच्या भावाबाबत फसवणूक केली परंतु यावर्षी सरकारची फसवणूक करायची हिम्मत होणार नाही. त्यासाठी आरपारची लढाई लढायची आहे, अशी ग्वाही देत शेतकऱ्यांसाठी शहीद होण्याचीही आपली तयारी आहे, असे तुपकरांनी सांगितले. आपल्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला आठ दिवसांचा वेळ आम्ही देत आहोत. जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन मुंबईकडे रवाना होणार व २९ नोव्हेंबर रोजी मुंबईत मंत्रलावयावर धडक देऊन मंत्रालय ताब्यात घेऊ, असा गंभीर इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे. यासाठी सर्व शेतकऱ्यांनी तयार व्हावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
* या आहेत प्रमुख मागण्या :
येलो मोझॅक, बोंडअळीमुळे व पावसात खंड पडल्याने सोयाबीन-कापूस व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी एकरी १० हजार रु. सरसकट नुकसान भरपाई मिळावी, सोयाबीनला प्रति क्वि. किमान ९ हजार व कापसाला किमान १२,५०० रु. भाव मिळावा, चालू वर्षाची पिकविम्याची अग्रिम व १०० टक्के पिकविमा भरपाई मिळावी, विनाअट संपूर्ण कर्जमुक्तीसाठी व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रु. प्रोत्साहन अनुदान मिळावे, जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, नांदुरा व मलकापूर तालुक्यात महापुराने झालेल्या नुकसानीची १०० टक्के नुकसान भरपाई मिळावी, वन्य प्राण्यांच्या त्रासापासून शेतकऱ्यांना बांधवांसाठी शासन स्तरावर वारकरी महामंडळाची स्थापना करावी, कृषी कर्जासाठी सी-बील ची अट रद्द करावी, अनुदानाच्या पैशाला बँकांनी लावलेले होल्ड काढावे, शेतरस्ते व पांदण रस्ते प्राधान्याने तात्काळ मिळावे आदी मागण्या यावेळी रविकांत तुपकर यांनी मांडल्या.
* कर्नाटकसह महाराष्ट्रातून पदाधिकाऱ्यांची उपस्थिती :
या महामोर्चात जिल्हाच्या कानाकोपऱ्यातील गाव-खेड्यांमधून शेतकरी, शेतमजूर, महिला, तरुण सहभागी झाले होते. तसेच कोल्हापूर, सोलापूर, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, यवतमाळ, अमरावती अशा राज्यभरातील विविध जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी तसेच कर्नाटक येथील रयत शेतकरी संघाचे पदाधिकारी देखील सहभागी झाले होते. रविकांत तुपकर हे राज्याचे नेतृत्व असून हे आंदोलन राज्यव्यापी ठरणार असून राज्यभरातील शेतकरी आणि कार्यकर्ते रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात या लढाईत सहभागी होतील, अशी ग्वाही या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सभेत बोलताना दिली.
