मुलांचे भविष्य उज्वल व्हावे यासाठी आई-वडील रात्रंदिवस मेहनत करतात* जीवनाची घडी विस्कटली की लवकर ताळ्यावर येत नाही - रूपालीताई चाकणकर

मुलांचे भविष्य उज्वल व्हावे यासाठी आई-वडील रात्रंदिवस मेहनत करतात
* जीवनाची घडी विस्कटली की लवकर ताळ्यावर येत नाही - रूपालीताई चाकणकर
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
     स्थानिक शिवसाई ज्ञानपीठ येथे विद्यार्थिनीला मार्गदर्शन करताना राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी सांगितले की, आई-वडील हे आपले मुले चांगली शिक्षण घेऊन त्यांचे भविष्य उज्वल व्हावे यासाठी रात्रंदिवस मेहनत करून जमापुंजी त्यांच्या शिक्षणावर खर्च करतात. मुलांनीही आई-वडील यांच्यावर खरे उतरावे , तसेच जीवनाची घडी विस्कटली की लवकर ताळ्यावर येत नाही, असा मौलिक सल्ला ही त्यांनी विद्यार्थ्यांची  संवाद साधताना 14 ऑक्टोबर 2023 रोजी दिला. 

      पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की,  जीवन अनमोल आहे, मनुष्य जन्माला एकदाच येतो, आणि जीवनही एकदाच मिळते. आई-वडील आपल्याला लहानसे मोठे करतात शिक्षण देतात स्वतः उपाशी राहतात परंतु आपली सर्व बरोबरी करतात आणि किशोर वयातच आपण वेगळ्या नादाला लागून भूलथापांना बळी पडून, ज्या वयात काही कळत नाही त्या वयात प्रेमात पडले जाते आणि नंतर कळते की, आपली फसवणूक झालेली आहे परंतु तोपर्यंत आयुष्याचे दोरी विस्कटलेली असते एकदा का जीवनाची घडी विस्कटली तर ती परत ठिकाणावर येत नाही त्यामुळे किशोर वयामध्ये आपण सातत्याने जागरूक असले पाहिजे समोरचा कसा बोलतो काय बोलतो त्याचा उद्देश काय आहे, याची आपण शहानिशा केली पाहिजे. आई-वडिलांसोबत मुक्तपणे गप्पा मारल्या पाहिजे, असे प्रतिपादन महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी केले.

       कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अड. नाझेर काझी होते तर डी. एस. लहाने तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अनुजताई सावळे महिला अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नंदाताई पाऊलझगडे प्रदेश प्रतिनिधी, महिला बालकल्याण विभागाच्या निर्मलाताई तायडे, मंगलाताई पांचाळ तालुका अध्यक्ष, मंगलाताई वायाळ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डी. एस. लहाने यांनी संस्थेबद्दल माहिती सांगून किशोरवयीन विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यासाठी रूपालीताई चाकणकर उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. यावेळी अनुजाताई सावळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अॅड. नाझेर काझी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून संस्थेचे प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करून रूपालीताई प्रत्यक्ष शाळा कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यां सोबत संवाद साधत असल्यामुळे महिला आयोग लोकांना लक्षात राहत आहे, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना भालेराव यांनी केले. तसेच कार्यक्रम प्रसंगी डॉ. सुनील दाभाडकर, कल्पना देवकर, सागर उबाळे यांनी मोलाचे सहकार्य केले.