सासरच्या जाचाला कंटाळून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या ; आरोपी अटक
चिखली : (एशिया मंच वृत्त)
तालुक्यातील सावरखेड येथील विवाहित महीला सपना विशाल कासारे हिने सासरच्या जाचाला कंटाळून घरातच साडीच्या साह्याने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना ६ ऑक्टोबर २०२३ रोजी घडली.
सदर घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, अमडापुर पो. स्टे. अंतर्गत असलेल्या सावरखेड येथे विवाहित महीलेच्या आत्महत्या केल्याचे घटनेवरून मृतकाची आई बेबी अर्जुन रणखांब यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अमडापुर पोलिसांनी आरोपींवर गुन्हे दाखल करून अटक केली आहे.
यामध्ये आरोपी पती विशाल दिलीप कासारे , सासरा दिलीप गोविंदा कासारे, सासू नंदा दिलीप कासारे व अनिता उर्फ पुष्पा सतिश खडके आदींचा समावेश आहे.
सविस्तर वृत्त असे की, मेहकर येथील सपना हीचा विवाह २० जून २०१८ रोजी सावरखेड येथील विशाल दिलीप कासारे याचे सोबत विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवस सुरळीत गेले दरम्यान तिला दोन मुली झाल्या मोठी स्वरांजली चार वर्षाची असून छोटी प्रांजळ दोन वर्षाची आहे. मात्र विशालचे गावातीलच एका महीले सोबत विवाहबाह्य अनैतिक संबंध असल्याचे लक्षात येताच सपनाने त्यास विरोध केल्याने तिला शिवीगाळ, मारहाण तिचा पती करत होता. यासंदर्भात विशाल विरोधात १ डिसेंबर २०२१ रोजी मेहकर पो.स्टे. मध्ये तक्रार दिली होती. नंतर पुन्हा त्याचा त्रास सुरू झाल्याने ३१ मे २०२२ रोजी मेहेकर पो.स्टे. ला तसेच १२ जून २०२३ रोजी ला त्याच्या व अनिता उर्फ पुष्पा सतिश खडके याचे विरोधात अमडापुर पो. स्टे. ला तक्रार दिल्या होत्या . मात्र त्या तक्रारीचा त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही. शिवाय तिला मुलगा होत नाही म्हणून सासू-सासरे त्यांच्याकडून तिला मानसिक त्रास होता. त्या असह्य झालेल्या त्रासाला कंटाळून तिने अखेर ६ ऑक्टोबर २०२३ ला आपल्या घरी साडीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली.
घटनेचे वृत्त मिळताच अमडापुर पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतकाची आई बेबी अर्जुन रणखांब यांनी ७ ऑक्टोबर २०२३ रोजी ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुध्द भा.द.वी कलम ३०६ , ४९८, ३२३,५०४ ,३४ अन्वये गुन्हे दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे.पुढील तपास अमडापुर पोलिस करीत आहे.
