संघर्षाची तयारी ठेवा परिस्थिती नक्की बदलेल -ठाणेदार संग्राम पाटील* नांद्राकोळी येथे डी. एस. लहाने यांच्या संकल्पनेतून समुपदेशन

संघर्षाची तयारी ठेवा परिस्थिती नक्की बदलेल -ठाणेदार संग्राम पाटील
*  नांद्राकोळी येथे डी. एस. लहाने यांच्या संकल्पनेतून समुपदेशन
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
 आत्महत्या ही मोजकीच अक्षरे धडकी भरवित आहे. कधी -कुठे कोण टोकाचे पाऊल उचलेल सांगता येत नाही. त्यात बुलडाणा शहरा नजीक नांद्रकोळी गावात आत्महत्येचा आकडा वाढत आहे. याबाबत माहिती मिळाल्याने प्राध्यापक डी. एस. लहाने यांनी आपल्या समाजशीलतेचा परिचय देत माणस उपचार तज्ञ डॉक्टरांची टीम घेऊन आत्महत्या चिंतन व उपाय यावर कार्यक्रम घेत नांद्राकोळी ग्रामस्थांचे समुपदेशन केले. संघर्ष करण्याची तयारी ठेवा परिस्थिती बदलास वेळ लागणार नाही असे प्रतिपादन ठाणेदार संग्राम पाटील यांनी यावेळी केले.

 नांद्राकोळी हे गाव छोटे असले तरी या ठिकाणी सातत्याने आत्महत्या होत आहे. आत्महत्याचा हा आलेख ग्रामवासींसाठी चिंता वाढणारा ठरला. याबाबत प्राध्यापक डी. एस. लहाने यांना माहिती मिळाल्याने त्यांनी मानसोपचार तज्ञ व प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष माधवराव हूडेकर होते. ठाणेदार संग्राम पाटील, डॉ. विकास खर्चे, डॉ. ज्ञानेश्वर मुळे, सरपंच आशाताई काळवाघे, उपसरपंच मनोज जाधव, जाकीर शाह शेठ, संजय काळवाघे आदींची उपस्थिती लाभली.

      पुढे बोलताना संग्राम पाटील म्हणाले की, जीवनात संघर्ष भरलेलाच आहे. प्रत्येकाला संघर्ष करावाच लागतो. आपण जेव्हा जवळ जाऊन पाहतो तेव्हा मोठ-मोठी माणसं सुद्धा संघर्ष करताना खचून गेल्याची दिसतात. मनाने कच खाल्ले की नको ते विचार डोकं वर काढतात. म्हणून मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण हे संतांनी सांगितलेच आहे. आपण मन प्रसन्न केले पाहिजे. संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे. त्यामुळे सर्व समस्या सोडवल्या जातील असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकामध्ये प्राध्यापक डी. एस. लहाने यांनी आयोजनामागची भूमिका मांडली. आत्महत्या करण्याचा विचार क्षनिक आहे मात्र त्याचे परिणाम कुटुंबावर दीर्घकाळ होत असल्याने मागच्यांचा विचार महत्त्वाचा ठरतो, असे विचार मांडले. आपण अडचणीच्या प्रसंगी एकमेकांजवळ व्यक्त झाले पाहिजे, विचार मांडल्याने, व्यक्त झाल्याने तुमच्या समस्या सोडविण्यास नक्कीच मदत होईल असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान जाधव यांनी तर आभार प्रदर्शन माजी सरपंच संजय काळवाघे यांनी केले.

        डॉ. विलास खर्च यांनी आत्महत्या मागची कारणे सांगितली, मनाच्या अवस्थांची उकल करून आपण जर परिवारातील आई-वडिलांचा आदर करत असेल, पत्नी, मुलांवर प्रेम करत असेल तर आपल्या पश्चात त्यांना होणाऱ्या यातनांचा विचार करावा, असे सांगून आत्महत्येपासून परावृत्त होण्यासाठी अनेक उपाय यावर प्रभावी भाष्य केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माधवराव हूडेकर यांनीही विचार मांडले.