व्यवसाय अर्थक्षम करण्यासाठी खर्च- उत्पादन यांचा ताळमेळ ठेवणे गरजेचे - डॉ. सुकेशजी झंवर* कृषि विज्ञान केंद्र येथील तीन दिवसीय प्रशिक्षण


 व्यवसाय अर्थक्षम करण्यासाठी खर्च- उत्पादन यांचा ताळमेळ ठेवणे गरजेचे - डॉ. सुकेशजी झंवर
* कृषि विज्ञान केंद्र येथील तीन दिवसीय प्रशिक्षण
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
      कृषि विज्ञान केंद्र, बुलडाणा येथे आयोजीत तीन दिवसीय गाई, म्हैस पालन, शेळी पालन, खेकडा पालन व वराह पालन प्रशिक्षण कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना, डॉ. सुकेशजी झंवर यांनी देश विदेशातील अनेक उदाहरणे देऊन कोणताही व्यवसाय अर्थक्षम करण्यासाठी त्यासाठी येणारा खर्च व येणारे उत्पादन यांचा ताळमेळ ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले. 
      सदर कार्यक्रम बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, बुलडाणा व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे, कृषी विज्ञान केंद्र , बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने 11 ते 13 ऑक्टोबर 2023 तीन दिवसीय गाई व म्हैस पालन तसेच शेळीपालन, खेकडा पालन व वराह पालन प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ कृषी विज्ञान केंद्र, बुलडाणा येथे पार पडला. त्याप्रसंगी डॉ. सुकेशजी झंवर, मुख्य कार्यकारी अधिकारी बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी, म. बुलढाणा डॉ. अनिल तारू, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा, डी.एम.साबळे - विभाग प्रमुख (प्रशिक्षण) एमसीडीसी पुणे, डोंगरखंडाळा गावचे सरपंच बबनराव गाडगे, ऋषीकुमार फुले, तज्ञ व्याख्याते पुणे, डॉ. एन. एस. देशमुख,विषय तज्ञ, डॉ. जगदीश वाडकर, अभय पावडे , अनिल देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. 

पुढे बोलतांना डॉ. सुकेशजी झंवर म्हणाले आपल्याकडे शेती हा परंपरागत व्यवसाय आहे तो तोट्यात जातो म्हणून सोडू शकत नाही, त्यावर आपल्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी असते अशा स्थितीत आधुनिक पद्धतीने शेती करून पर्यायी संधीचा शोध घेणे गरजेचे आहे, त्यासाठी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून आपण गाय, म्हैस, शेळी, मत्स्य, वराह, खेकडा पालन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केलेले आहे. यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, साखर संकुल, पुणे यांनी तज्ञ व्याख्याते यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. आता आपल्याला मेहनत करण्याची क्षमता व प्रामाणिकपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे , तरच आपण या व्यवसायांमध्ये यशस्वी होऊ शकतो असे सांगितले. 

डॉ. अनिल तारू यांनी सेंद्रिय खताचा अभाव, त्यामुळे शेतीतील कमी होणारे नत्राचे प्रमाण त्यामुळे पुढील पिढीला आपण काय देणार याबद्दल विचार करण्याची वेळ आलेली आहे. यासाठी शेळी पालन, म्हैस पालन यासारखे पूरक व्यवसायची कास धरून उत्पन्नामध्ये वाढ होऊन शेतीचा समतोल साधता येईल असे सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये दिगंबर साबळे यांनी महाराष्ट्रातील 60 ते 70 टक्के शेतजमीन ही कोरडवाहू आहे म्हणजेच पूर्णपणे पावसावरती अवलंबून आहे. अशा मध्ये शेतीचा विकास करताना अनेक समस्यांना शेतकरी सामना करत आहे. अवकाळी पाऊस, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, वातावरणातील बदल अशा बदलत्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे व परिणामी उत्पन्नामध्ये घट होत असून उत्पन्ना पेक्षा खर्च जास्त होत असल्याने अनेक शेतकरी जीवनामध्ये नैराश्याचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जोड धंद्याची साथ देऊन परिस्थितीवर मात करण्याचे त्यांनी आवाहन केले. तसेच त्यांनी बुलडाणा अर्बन बँकेने सुरू केलेल्या या प्रशिक्षणाच्या चळवळीचे स्वागत केले. 
      महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाने आत्तापर्यंत बुलडाणा अर्बन बँकेच्या आर्थिक साह्याने 200 हून अधिक शेतकऱ्यांना विविध शेतीपूरक व्यवसायांचे व्यावसायिक प्रशिक्षण दिलेले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनिल देशपांडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मयूर शेळके, श्रीमती शुभांगी भोलनकर , युवराज खोपडे , बुलडाणा अर्बनचे सर्व अधिकारी व कृषी विज्ञान केंद्रातील सर्व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.