दसऱ्याच्या दिवशी झालेल्या वेगवेगळया दोन अपघातात 5 जण ठार
* शिरपूर व हातणी - मालगणी गावावर शोककळा...
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
दसऱ्याच्या दिवशी चिखली तालुक्यातील शिरपूर व हातणी - मालगणी गावावर शोककळा पसरली. बुलडाणा - चिखली रोडवर 24 ऑक्टोबर 2023 ला घडलेल्या दोन वेगवेगळया अपघातात 5 जण ठार झाले. दुपारी तवेरा व मोटार सायकलची धडक झाली यात शिरपूर येथील दोघेजण ठार झाले. तर रात्री 9 च्या दरम्यान घाट माथ्यावर दोन दुचाकींची समोर समोर धडकल्या यात तीन जण ठार झाले आहे.
सदर घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, चिखली तालुक्यातील शिरपूर येथील दोन युवक आपल्या दुचाकीने बुलडाणाकडे येत असताना केळवद जवळ समोरून भरधाव वेगात येणाऱ्या तवेरा वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात २० वर्षीय तेजस कैलास हिवाळे याचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी सार्थक सुनील हिवाळे याला वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके तसेच जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल बोन्द्रे यांनी तात्काळ बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने सार्थक सुनील हिवाळेला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजी नगर येथे रेफर करण्याची तयारी सुरू असतानाच त्याचा देखील मृत्यू झाला.
दुसरी घटना रात्री 9 वाजेच्या सुमारास बुलडाणा ते चिखली मार्गावर केळवद जवळच्या घाट माथ्यावर घडली. यामध्ये दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली यात 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर एकाला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजी नगर येथे रेफर करण्यात आले आहे. बुलडाणा चिखली मार्गावर दोन दुचाकीची धडक झाली. यात दोन्ही दुचाकीवरील 4 जण गंभीर जखमी झाले. त्यांना गावातील काहीजणांनी तात्काळ बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यातील पती-पत्नी ज्ञानेश्वर मोतीराम जाधव वय 40 वर्ष, भाग्यश्री ज्ञानेश्वर जाधव वय 30 वर्ष रा. हातणी तसेच संदीप शरद झिने वय 25 वर्ष रा. मालगणी या तिघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर गंभीर जखमी अशोक गवई वय 40 वर्षे रा हातणी यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे रेफर करण्यात आल्याची माहिती चिखली पोलिसांनी दिली आहे.
