बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
तालुक्यातील पिंपळगाव सराई येथील वीर जवान अक्षय लक्ष्मण गवते (२०) यांना सियाचीन मधील याचीन ग्लेशीअर मध्ये कर्तव्यावर असताना वीरमरण आले. २० ऑक्टोबरच्या रात्री ११ वाजे दरम्यान रुग्णालयात त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला असता त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अक्षय यांच्यावर २३ ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी जन्मगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
३० डिसेंबर २०२२ रोजी अक्षय "अग्नीवीर" म्हणून सैन्यात भरती झाले होते. सियाचीन मधील याचीन ग्लेशीअर मध्ये ते कर्व्यावर होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना सैनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र २० आॅक्टोबर ला तीव्र हृदयविकाराचा धक्का आला त्यातच त्यांचा मृत्यू झाला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे नेते खा. राहुलजी गांधी व काँग्रेस अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खर्गे यांनी ट्विटर वर श्रध्दांजली अर्पण करत अग्नीवीरांच्या विविध समस्यांवर केंद्रातील सरकारला प्रश्न विचारले होते. यानिमित्त 26 ऑक्टोबर रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी माजी सैनिक विभाग चे राष्ट्रीय अध्यक्ष कर्नल रोहीत चौधरी हे अग्निविर अक्षय गवते यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देणार आहेत. त्यानंतर ते बुलडाणा येथील हाॅटेल रामा ग्रँट चे सभागृह येथे दुपारी 1 वाजता पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
